मतदार यादी पुनःरीक्षण कार्यक्रम रंगीत फोटोसह होणार नावनोंदणी आणि मिळणार स्मार्ट कार्ड



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- आगामी सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हतादिनांकानुसार मतदार याद्या पुनःरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांना आपले रंगित छायाचित्र द्यावे, नवीन मतदारांनी , मतदार यादीत नावे नसलेल्या मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. नवीन मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
 या पत्रकार परीषदेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाड या उपस्थित होत्या. यावेळी पुनःरीक्षण कार्यक्रम सांगण्यात आला. तो याप्रमाणे-  15 मे ते 20 जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरोघरी भेट मोहिम राबवतील. 21 जून ते 31 जुलै मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व इमारत पाहणी, 1 ते 31 ऑगस्ट  पुरवणीसह प्रारुप मतदार यादी तयार करणे,  1 सप्टेंबर प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दावे व हरकती सादर करणे, 30 नोव्हेंबर दावे व हरकती निकाली काढणे, 3 जानेवारी 2019 डाटा बेस अद्यावतीकरण व मतदार यादी छपाई, 4 जानेवारी 2019 मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी याप्रमाणे कार्यक्रम आहे.
 यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण 21 लाख 54 हजार 372 मतदार आहेत. सध्या कृष्णधवल छायाचिते असलेल्या मतदारांची संख्या 2 लाख 37 हजार 119 असून रंगीत छायाचित्र स्विकारणे व मतदार यादी अद्यावतीकरणाचे काम सुरु आहे. ऑनलाईन मतदार नाव नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन मतदार नोंदणी झालेल्या19997 मतदारांना एपिक स्मार्ट ओळखपत्र देण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण वर्ग झाले आहे.  मतदान नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, निवडणूक लेखनिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची 40 गुणांची परीक्षाही घेण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी काय कराल?
मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे eci.nic.in या संकेतस्थळावर मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध www.nvsp.in या लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करता येईल.
                        तसेच सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या घरोघर भेटी होणार आहेत. तरी घरोघर भेटी दरम्यान गृहनिर्माण सोसायटीकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना योग्य ते सहकार्य मिळावे असे आवाहन करणेत येत आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांजकडे पुरविणेत आलेल्या यादीनुसार ज्यांचे मतदार यादीत कृष्णधवल (Black & White) फोटो आहेत किंवा मतदार यादीत फोटो नाहीत अशा मतदारांचे रंगीत फोटो संबंधित मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांजकडे किंवा तहसिलदार कार्यालयात जमा करावे असे आवाहन करणेत येत आहे. सदर रंगीत फोटो जमा केल्यानंतर मतदारांना स्मार्ट कार्डप्रमाणे नवीन रंगीत मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे.
                        तरी या मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नवीन मतदारांनी नोंदणी करावी. तसेच वंचित मतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार यांनी विशेष करुन आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक