प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा शाळा असावी - जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-: देशाच्या जडणघडणीत तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची असते तसेच अभ्यासासोबतच खेळाची जोड दिली तर, तरुणांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा शाळा सुरु व्हावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिल्लीत केले.
              महाराष्ट्र दिनानिमीत्त येथील कस्तुरबा गांधी ‍मार्ग ‍ स्थित महाराष्ट्र सदनात ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवाच्या दुसऱ्या  दिवशी "क्रीडा क्षेत्रासमोरील नवी आव्हाने"  या चर्चासत्रात, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन पट्टु श्रीमती मंजूषा पवनगडकर- कॅंवर, स्पोटर्स् सीड या खाजगी कंपनीचे संस्थापक सुधांशु फडणीस आणि चर्चासत्राचे नियंत्रक श्री.आगाशे याचा सहभाग होता.
                  डॉ. विजय सुर्यवंशी म्हणाले, वर्ष 2013-14 मध्ये कोल्हापूरचे जिल्हधिकारी असताना अनेक नवीन नवीन उपक्रम हाती घेतले. ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील पायाभुत सुविधांचा विकास त्यापैकी एक आहे. कोल्हापूर जवळ चंबुखडी स्थित शिंगणापूर येथील राजर्षी शाहु महाराज शाळा बऱ्याच दिवसांपासून बंद होती. या शाळेचे  क्रीडा निवासी शाळेत रुपांतर करुन आज या भागातून विविध खेळांमध्ये नैपूण्य असलेल्या मुलांचा शोध घेत आहे. आज या मुलांनी राज्य व देश पातळीवर 70 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. या मुलांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांच्या पालकांना, गावाला, जिल्ह्याला देशपातळीवर ओळख प्राप्त झाली आहे. या यशस्वी संकल्पनेचा अभ्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही केला आहे. या मुलांच्या भविष्यातील संधींबाबत बोलताना राज्य शासनाने अशा मुलांसाठी 5 टक्के आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये केल्याची माहितीही यावेळी दिली.
                स्पोटर्स् सीड या खाजगी कंपनीचे संस्थापक सुधांशु फडणीस यांनी गुजरात राज्याच्या शाळांमध्ये राबविलेल्या क्रीडा अभ्यासक्रमाची माहिती दिली. श्री.फडणीस हे राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेतून एम.बी.ए  झाले असून उत्तम बॅडमिंटन पटू आहेत. राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधत्व करत त्यांनी सध्या गुजरात मध्ये 33 जिल्हास्तरीय क्रीडा शाळांमध्ये सार्वजनिक खाजगी सहभागाने (पीपीपी) कार्यरत आहेत. या मॉडेल अंतर्गत, राज्यशासना मार्फत क्रीडा संबंधीत लागणारी साधनसामुग्री, कोचिंग, तर शाळातर्फे पायाभूत सूविधा – मैदान, मैदानाचे सपाटीकरण व तत्सम सहाय्य प्राप्त होते. मात्र, खाजगी कंपनी, संस्थाकडून त्यांना योग्य प्रशिक्षण, क्रीडा अभ्यासक्रम तसेच डिझाईनिंग व मॉनिटरिंग पुरविण्यात येते.  200 मुलांपासून सुरु झालेला हा उपक्रम आज, क्रीडा क्षेत्राच्या 22 विविध खेळांमध्ये 5200 मुले प्रशिक्षण घेत आहेत.

               राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू श्रीमती मंजूषा पवनगडकर- कॅंवर यांनी त्यांच्या क्रीडा प्रवासावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय पातळीवर चार वेळा महिला एकेरीत तब्बल सहा वेळा  मिश्र दुहेरीत बॅडमिंटन खेळात अजिंक्य पद पटकावले असल्याची माहिती दिली. पुढे  बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या यशस्वीतेचे श्रेय माझ्या आजींना जाते. कुंटुंबात सर्वजण बॅडमिंटनचे छंद जपत असल्याचे सांगत, आज त्यांनी स्वबळावर युनायटेड शटर्स बॅडमिंटन अकादमीच्या संस्थापक असल्याचे  माहिती दिली. इंडियन ऑईल्‍ कॉर्पोरेशनच्या उत्तर विभागाच्या त्या प्रमुख असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की, क्रीडा क्षेत्रातातून तयार झालेल्या खेडाळुवृत्तीमुळे तो कुठल्याही क्षेत्रात अपयशाचा सक्षमपणे सामना करु शकतो.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक