आपत्ती व्यवस्थापनाचा वस्तूपाठ : वाहुन गेलेल्या मोरीची 12 तासात पुन्हा उभारणी : प्रशासनाची प्रयत्नांची शर्थ; पाली खोपोली रस्त्यावरील रहदारी पुर्ववत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-  अनिश्चितता हा आपत्तीचा स्थायी भाव. तरीही आलेल्या आपत्तीला धैर्याने, सुनियोजित कार्य्पद्धतीने आणि संघटितपणे सामोरे गेले तर त्या आपत्तीचा सहज बिमोड करता येतो.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने याचा वस्तूपाठच घालून दिलाय तो काल (दि.25) रोजी घडलेल्या घटनेला सामोरे जाऊन. रविवारी (दि.24) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाकण – पाली - खोपोली रस्त्यावर खुरावले फाट्याजवळील पाईप मोरी सोमवारी (दि.25) सकाळी अकरा वाजेच्या सुमारा वाहुन गेल्याने  रहदारी बंद झाली होती. परंतू शासनाच्या यंत्रणेने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन  वाहुन गेलेली ही मोरी भर पावसात पुन्हा नव्याने बांधून अवघ्या 12 तासात रहदारी पुर्ववत सुरु केली.
रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत होता. जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच 548- अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला.  या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या अर्ध्याभागाचे काम सुरु होते व जुन्या अर्ध्या भागावरुन रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेली पाईप मोरी आदल्या रात्री पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहुन गेली. सोमवारी (दि.25)सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची खबर पोलीस पाटील यांनी तहसिलदार बी.एन. निंबाळकर यांना दिली. त्यावेळी तहसिलदार निंबाळकर हे निवडणूक कामात व्यस्त होते. परंतू परिस्थितीचे गांभिर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व कक्षप्रमुख सागर पाठक यांना देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्व संबंधित घटकांचा समन्वय अवघ्या अर्धा तासात करण्यात आला. घटनास्थळी तहसिलदार निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.
लगेचच यंत्रणा कामाला लागल्या. सर्वात आधी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी रहदारीचे नियमन सुरु केले. धोकादायक मार्गावरुन रहदारी थांबवण्यात आली. जड वाहने वाकण फाट्यावरुन पेण मार्गे वळविण्यात आली. तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे रहदारीचे नियोजन झाले.
त्यानंतर तात्काळ दोन हायड्रा, दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्ड मशिन्स पाचारण करुन साडेबाराच्या सुमारास कामाला सुरुवात करण्यात आली. पाईप मोरीचे जुने पाईप हे  600 मिमि चे होते. ते हटवून त्या ठिकाणी 1200 मिमी चे  सिमेंट पाईप टाकणे आवश्यक होते. तेथून जवळच जांभुळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाईप आणले.  रस्त्याचा भराव मोकळा करुन पाईप टाकण्यासाठी जागा तयार करुन पाईप टाकण्यात आले. त्यानंतर हा तब्बल 14 मिटर रुंद, 5 मिटर लांब असलेल्या खड्ड्यात भराव टाकण्याचे काम सुरु झाले. त्यासाठी खडी वापरण्यात आली.  तब्बल 500 क्युबिक मिटर्सचा हा भराव भरुन व रस्त्याचे सपाटीकरण  करुन खडीचा रस्ता तयार करण्यात आला. यासाठी 10 ते 15 डंपर सातत्याने  भरावाची वाहतुक करीत होते. या दरम्यान सतत पाऊस सुरुच होता. त्या परिस्थितीतही न थांबता अव्याहतपणे हे काम सुरु होते. रात्री तब्बल पाऊण वाजता या रस्त्याचे काम पूर्ण करुन त्यावरुन रहदारी पुर्ववत करण्यात आली.
 या दरम्यान तहसिलदार निंबाळकर आपल्या महसूल यंत्रणेतील सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून निवडणूकीची जबाबदारी पार पाडण्यास रवाना झाले होते. मात्र त्यासोबतच सर्व घडामोड वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जात होती. निवडणूकीचे काम आटोपून तहसिलदार निंबाळकर पुन्हा घटनास्थळी पोहोचले. दरम्यान प्रांताधिकारी रविंद्र बोंबले हे ही घटनास्थळाची पाहणी करुन गेले. या घटनेवर निवडणूकीच्या कामातही निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हाधिकारी अभय यावलकर हे सातत्याने लक्ष ठेवून होते. सातत्याने अपडेट्स घेतले जात होते, अशी माहिती तहसिलदार निंबाळकर यांनी दिली. रात्री पाऊण वाजता तहसिलदारांनी रहदारी पुर्ववत सुरु केल्याचा मेसेज केला, तेव्हा साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आता सध्या या रस्त्यावरुन  रहदारी पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्र अद्याप सुरु केलेली नाही. ‘अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या अर्ध्या भागाचे कॉक्रीटीकरण पुर्ण झाल्यावर त्यावरुन रहदारी वळवून उर्वरित भागाचे काम पुन्हा करण्यात येईल’, अशी माहिती उपअभियंता निफाडे यांनी दिली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक