13 कोटी वृक्ष लागवड : आजपासून अभियानास प्रारंभ : 37 लक्ष रोप लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-   राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने सोडला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून आता सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टात रायगड जिल्ह्यात या वर्षी 30 लक्ष 6 हजार  रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून ही रोपे उद्या (रविवार दि.1 ते 31 जुलै दरम्यान) सुरु होणाऱ्या अभियानात जिल्हाभरात शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत व विविध संस्था, नागरिकांमार्फत लावण्यात येतील. रायगड जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून उद्दिष्ट जरी 30 लक्ष 6 हजार रोपे लागवडीचे आहे, तरी प्रत्यक्षात 37 लक्ष 22 हजार 388 रोपे लावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे हे विशेष.
या महोत्सवात जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी , सामाजिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
विभागनिहाय रोप लागवड
जिल्ह्यात विभागनिहाय रोपे लागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट्य याप्रमाणे- अलिबाग वनविभाग 9 लक्ष, रोहा वनविभाग 5 लक्ष,सामाजिक वनीकरण विभाग 3 लक्ष,  रायगड जिल्ह्यातील 803 ग्रामपंचाती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीत 1103 रोपे या प्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत 10 लक्ष रोपे, पनवेल महानगरपालिकेतर्फे 15 हजार तर अन्य शासकीय विभागांमार्फत 2 लक्ष 91 हजार असे एकूण 30 लक्ष 6 हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट  जिल्ह्यात पुर्ण केले जाणार आहे. यासाठी सर्व विभागांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात आले असून गावपातळीपर्यंतच्या यंत्रणा यात सहभागी झाल्या आहेत.
7 लाख जादा रोपे लागवडीची तयारी
दिलेले उद्दिष्ट्य 30 लक्ष 6 हजार रोपांचे असले तरी वनविभागाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर अलिबाग वनविभागाने 10 लक्ष 31 हजार 223, रोहा वन विभागाने 4 लक्ष  98 हजार 832, ग्रामविकास विभागाने 11 लक्ष 82 हजार 675 , पनवेल महानगरपालिकेने 15 हजार तर अन्य विभागांनी 6 लक्ष 73 हजार 226 अशा एकूण 37 लक्ष 22 हजार 388  रोप लागवड स्थळांची माहिती अपलोड केली आहे. थोडक्यात  दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 7 लक्ष 16 हजार 388 जादा रोपे लागवड करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
रोप लागवडीसाठी ‘लॅंड बॅंक’
इतके मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी जिल्ह्यात ‘लॅंड बॅंक’ तयार करण्यात आली आहे. त्यात  उपवनसंरक्षक अलिबाग हे 1365.11 हेक्टर आर क्षेत्रावर,  उपवनसंरक्षक रोहा 656, सामाजिक वनीकरण विभाग 83, ग्रामविकास विभाग 447.55, कृषि विभाग 362.80 तर महसूल विभाग 338.96 हेक्टर आर क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध केले आहे. तर  जिल्ह्यातील सावित्री, काळ, गांधार ( 108 किमी), कुंडलिका, आंबा नदी (80 किमी), उल्हास नदी (10 किमी), पाताळगंगा नदी (50 किमी) असे एकूण 248 किमी लांबीच्या नदी पात्रांच्या काठांपासून एक किमी रुंदीच्या क्षेत्रात ही रोपांची लागवड होणार आहे. त्यात एकूण 693.49 हेक्टर आर जमीन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी यांनी दिली.
71 लक्ष रोपांची उपलब्धता
 या मोहिमेत लागवड करण्यासाठी जिल्ह्यात 99 रोपवाटीकांमधून 71 लक्ष 14 हजार रोपांची उपलब्धता आहे. यात गेल्या वर्षीच्या मोहिमेतील शिल्लक व पुढल्या वर्षी लागवड करावयाच्या रोपांचे नियोजन यांचाही समावेश असला तरी यावर्षी इतक्या संख्येने रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायतींना रोपांची उपलब्धता मोफत
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. तथापि सर्व ग्रामपंचायतींना ही रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी ए.एस. निकत यांनी दिली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या 13 आधुनिक तर अन्य 6 रोप वाटिका आहेत, त्यातून 17 लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध रोपवाटीकांमधून त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रात रोपे पोहोच करण्यासाठी तालुकास्तरावरुन तयार करण्यात आलेल्या वाहतुक आराखड्यानुसार रोपे पोहोचविण्याचे काम सुरु झाले आहे अशीही माहिती देण्यात आली.
जिवंत रोपांचे प्रमाण समाधानकारक
गत कालावधीत लागवड केलेल्या रोपांची जतन व संवर्धन यावरही शासन लक्ष ठेवून आहे. त्यांचाही नियमित आढावा घेण्यात येतो. त्यासाठी लागवड केलेल्या रोपांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या त्या विभागांवर सोपविण्यात आली आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सन 2016 मध्ये लागवड केलेल्या 5 लक्ष 79 हजार 422 रोपांपैकी सध्या 4 लक्ष  28 हजार 189 रोपे जिवंत आहेत. त्याची टक्केवारी 73.90 इतकी आहे. तर सन 2017 मध्ये जिल्ह्यात 11 लक्ष  18 हजार 117 रोपांपैकी  9 लाख 50 हजार 399 रोपे जिवंत आहेत.  त्याची टक्केवारी 85 इतकी आहे. हे प्रमाण समाधानकारक मानले जात आहे.
विविध संस्था, संघटनांचा सहभाग
 या अभियानात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन पुर्ण झाले असून  जिल्ह्यातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संस्था रेवदंडा ही श्री सदस्यांची संस्था, महाड येथील हिरवळ प्रतिष्ठान, ग्रीन आर्मीचे सभासद, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, गावांमधील संयुक्त वनव्यवस्थापन समिती सभासद यांच्यासह विविध सामाजिक संघटना या अभियानात सहभागी होणार आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
महाराष्ट्र हरीत सेना सभासद होण्याचे आवाहन
या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र हरीत सेना सभासद नोंदणीही करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लाख 45 हजार 263 जण यात सहभागी झाले आहेत. सहभागी होण्यासाठी www.greenarmy.maharashra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन  उजव्या बाजूला हरीतसेना महाराष्ट्र नोंदणी  येथे  क्लिक करुन स्वतःची माहिती भरावी. त्यानंतर संबंधितांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर  ओटीपी  क्रमांक येईल तो टाकून  लॉगीन करावे.  यात वैयक्तिक व संस्था अशा दोन्ही पातळीवर नोंदणी करता येते. तो पर्याय निवडून  दुसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक  माहिती भरुन सबमिट करा. हे टप्पे पुर्ण झाल्यावर  यशस्वी नोंदणी झाल्यावर आपणास महाराष्ट्र हरितसेना  सदस्यत्व प्रमाणपत्र मिळेल. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम मौजे कार्ला येथे
13 कोटी वृक्ष लागवड मोहिम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम मौजे कार्ला, कं.नं. 160, ता.अलिबाग येथे रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अदितीताई तटकरे, लोकसभा सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,      आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. अवधुत तटकरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, व उप वनसंरक्षक मनिष कुमार यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक