खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केली खारभूमी योजनांची पाहणी





अलिबाग, दि. ०३ : राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी आज रायगड जिल्ह्यातील विविध खारभूमी योजनांना भेटी देऊन या योजनांची मान्सूनपूर्व पाहणी केली. या दौऱ्यात मंत्री श्री. रावते यांनी पोफेरी, माणकुले, हाशिवरे व नवीन मिळकत या खारभूमी योजनांची मान्सूनपूर्व पाहणी केली.
मंत्री श्री. रावते यांनी आपल्या या दौऱ्यात पोफेरी (ता. अलिबाग) या खारभूमी योजनेच्या बांधाची तसेच उघाडीची पाहणी केली. या योजनेच्या पावसाळ्यापुर्वी करावयाच्या दुरुस्ती कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
अलिबाग तालुक्यातील माणकुले, हाशिवरे येथील बांधाची पाहणी केली. खाडीमधून समुद्राचे खारे पाणी घुसून योजनेच्या लाभक्षेत्राच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी चर्चा करुन या योजनेविषयी करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली.  तसेच नवीन मिळकत खारभूमी योजनेच्या उघाडीची पाहणी करुन दुरुस्ती कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माणकुले, हाशिवरे या खारभूमी योजनेसाठी ९ कोटी ६८ लाख रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर मंत्री श्री. रावते यांनी उरण तालुक्यातील कोणी केळवणे या खाजगी खारभूमी योजनेसही भेट दिली. या योजनेच्या दुरुस्तीचे काम जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागामार्फत यंत्राद्वारे करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगती विषयी मंत्री श्री. रावते यांनी समाधान व्यक्त केले. या कामासाठी आमदार मनोहर भोईर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या योजनेस सुमारे दहा वर्षापासून पडलेल्या खांडी दुरुस्त करण्यात आल्या असून त्यामुळे सुमारे १ हजार २५० एकर क्षेत्राचे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होणार आहे. 
खारभूमीच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद
सन १९८२ पासून मागील वर्षापर्यंत कोकणातील खारभूमी योजनांसाठी दरवर्षी सरासरी फक्त १० कोटी रुपये इतका कमी निधी मंजूर करण्यात आला होता. पण मंत्री श्री. रावते यांनी स्वत: लक्ष घालून यावर्षी १०० कोटी रुपये इतका निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यापैकी खारभूमी विकासाच्या विविध कामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मंत्री श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खारभूमी खात्याचे अधिक्षक अभियंता अ. पा. आव्हाड, कार्यकारी अभियंता शि. पं. स्वामी, उपअभियंता सुरेश शिरसाट तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड