पिक पाणीःभात लावणीची लगबग


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  भात हे रायगड जिल्ह्यातील मुख्य पिक. या पिकाच्या लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्र हे 1 लाख 5 हजार हेक्टर इतके होईल असा कृषि विभागाचा अंदाज आहे. 
भात शेतीच्या मशागतीचे उलकटणी, राब पेरणी असे महत्त्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता सध्या सर्वत्र चिखलणी सुरु झाली आहे. या दरम्यान पिकाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्यादृष्टीने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी खताचीही मुबलक उपलब्धता करुन देण्यात आली आहे. लावणीनंतरही चाळीस दिवसात दोनदा नत्राची मात्रा दिली जाते. यासंदर्भात शासनाचा कृषि विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि  तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन देत आहे.  शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता यापुर्वीच करुन देण्यात आली आहे. त्यानुसार भाताची पेरणी (राब पेरणी) आटोपली आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा खताचा व किटकनाशकांचा साठा  शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध आहे, अशी माहितीही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली. यापुढील टप्प्यात मोठी होत आलेली रोपे लावणीचे काम सुरु होईल. त्यासाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मजूरांची उपलब्धता  पाहून ही कामे वेळीच पुर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
 भाताच्या काही जाती ह्या 48 दिवसांत, काही 52 तर काही 62 दिवसांत तयार होतात. त्यादृष्टीने शेतकरी आपल्या शेती कामांचे नियोजन करीत असतात.
खरीप पेरणीचे चित्र
 जिल्ह्याच्या खरीप हंगामासाठी एकूण 1 लाख 14 हजार 443 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली राहणार असून भात पेरणी 1 लाख 5 हजार 261 हेक्टर इतक्या क्षेत्रावर होईल, असे अनुमान आहे.  त्या खालोखाल 7128 हेक्टरवर नागली, 975 हेक्टर इतर तृणधान्य, 906 हेक्टर तूर, 173 हेक्टर इतर कडधान्य याप्रमाणे नियोजन आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांची पेरणी पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट होईल.
खते- बियाण्यांची उपलब्धता
या हंगामासाठी जिल्ह्यात 15 हजार 155 क्विंटल भात बियाण्याची उपलब्धता करण्यात आली  होती  तर 24 हजार 600 मेट्रिक टन इतक्या रासायनिक खताची उपलब्धता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. तसेच 34 हजार 900 लिटर्स किटकनाशके व बुरशी नाशकांची उपलब्धता करण्यात आली आहे.
जिल्ह्याची कृषि विषयक माहिती
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 6 लाख 86 हजार 892 हेक्टर
निव्वळ पेरणीखालील क्षेत्र 2 लाख 1 हजार 322 हेक्टर
खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 41 हजार 200 हेक्टर
रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 21 हजार 100 हेक्टर
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक