विशेष विवाहासाठी ऑनलाईन नोटीस बंधनकारक : 1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10: विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाहेच्छुक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस ऑनलाईन पद्धतीने बंधनकारक करण्यात आले असून येत्या 1 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
            यासंदर्भात नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, कोकण विभाग ठाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छुक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहीवाशी यासाठीच्या पुराव्याच्या कागदापत्रांसह संबंधित जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना सादर करावी लागते आणि नोटीस फी भरावी लागते.  सदर वर-वधू संबंधित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी सदर नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावतात.  तसेच वर  किंवा वधू या दोघांपैकी एकजण अन्य जिल्ह्यातील असल्यास या नोटीसींची एक प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते. 
            विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसांच्या आत नियोजित विवाहाबद्दल आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या साठ दिवसात वर-वधू तीन साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यासमोर हजर राहतात व विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देतील.
            प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई, मुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे देखील संगणकीकरण केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आली आहेत. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एन्ट्री करण्यामध्ये पक्षकारांचा वेळ जाऊ नये व त्यामध्ये चुका होऊ नयेत, याकरीता नागरीकांना डाटा एन्ट्री करण्याची सुविधा विभागाने igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे.
            विशेष विवाह नोंदणीकरीता वर व वधू यांना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे व तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रीया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पूर्ण करता येईल अशी व्यवस्था 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठीची लिंक देखील विभागाच्या igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यवस्थेचा/सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने संबंधित विवाह निंबधक कार्यालयांमध्ये सूचना फलक लावण्यात आले आहेत.
            ऑनलाईन नोटीसच्या जनजागरणाचा भाग म्हणून पुणे येथील विवाह निबंधक कार्यालयाच्या परिसरात विभागाने नागरीकांकरीता ऑनलाईन नोटीस सुविधेच्या वापरासाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य मार्गदर्शक ऑपरेटरसह मोफत उपलब्ध ठेवले आहे. तसेच 1 ऑगस्ट, 2018 पासून विशेष विवाहसाठीची नोटीस ऑनलाईन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक