जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक : जिल्ह्यात 106 कोटी रुपयांचे कृषि कर्ज वाटप : शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5-  जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षातील कृषि हंगामांसाठी  246 कोटी  रुपये  कृषि कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी यंदाच्या खरीप हंगामात अद्यापपर्यंत (4 जुलै अखेर)105 कोटी 99 लाख 78 हजार रुपयांचे कृषि कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती आज जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या बॅंकेत संपर्क साधावा व बॅंकांनी शेतकऱ्यांना हंगाम पुर्ण होण्याच्या आत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही यावेळी जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका यांनी केले.
जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस  बॅंक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक  सी.के. पराते, रिजर्व बॅंकेचे सहाय्यक प्रबंधक  बी.एम. कोरी,  नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुधाकर रघतवान,  बॅंक ऑफ इंडियाचे  मुख्य व्यवस्थापक शरद जोशी,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी.एम खोडका तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खरीप हंगामासाठी बॅंकांनी द्यावयाच्या पिक कर्जाचा आढावा घेण्यात आला.
 त्यावेळी माहिती देण्यात आली की,  जिल्ह्यात पिक कर्जाचे सन 2018-19 करीता 246 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.  त्यात खरीप हंगामासाठी 201 कोटी 40 लाख तर रब्बी हंगामासाठी 44 कोटी 60 लाख रुपये उद्दिष्ट आहे.  जिल्ह्यात सहकारी व राष्ट्रीयकृत बॅंकांचे मिळून  21 हजार 166 सभासद शेतकरी आहेत. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत 105 कोटी 99 लाख 78 हजार रुपयांचे कृषि कर्ज वाटप झाले आहे. ही टक्केवारी 52.63 टक्के इतकी आहे. अद्याप जिल्ह्यातील अन्य शेतकरीही मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तरी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
 जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत  एकूण 18 हजार 73 शेतकऱ्यांना 41 कोटी 7 लाख 26 हजार 657 रुपये कर्जाची माफी देण्यात आली आहे. त्यामुळे हे शेतकरी सुद्धा कृषि कर्जाचा लाभ घेण्यास पात्र झाले. बॅंकांनी आतापर्यंत जे कृषि कर्ज वाटप केले आहे त्यात 6738 शेतकरी हे कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी आहेत. तर अन्य शेतकरी 14 हजार 428 आहेत. असे एकूण 21 हजार 166 शेतकरी खातेदारांनी यंदाच्या कृषि कर्जाचा (105 कोटी 99 लाख 78 हजार रुपये) लाभ घेतला आहे.
जिल्ह्यातील बॅंकांनी (राष्ट्रीयकृत व सहकारी) शेतकऱ्यांपर्यंत कृषि कर्जाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश यावेळी सर्व बॅंक अधिकाऱ्यांना देण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक