13 कोटी वृक्ष लागवड हरित रायगडचा संकल्प करु या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-  राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात यानिमित्त 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा व हरित रायगड साकारण्याचा संकल्प करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज  मौजे कार्ला, कं.नं. 160, ता.अलिबाग येथे आयोजित मुख्य शासकीय  वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलतांना केले.
राज्य शासनाच्या वनविभागातर्फे 13 कोटी वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्ह्यातील सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपवनसंरक्षक मनिष कुमार,  उपजिल्हाधिकारी रोहयो विश्वनाथ वेटकोळी, जयेश पाटील, सागर जंगम, रोहिणी संतोष पाटील,  विलास पाटील,  मोनिका म्हात्रे  आदी स्थानिक झिरड, नेऊली व वाडगाव येथील सरपंच,  संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,ग्रामस्थ आदी मोठ्या संख़्येने उपस्थित होते.
 यावेळी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर  सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.एस. निकत यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करुन वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात आहोत. छत्रपती शिवाजीमहाराजांनी आपल्या आज्ञापत्रातून वृक्षांचे महत्त्व साडेतीनशे वर्षांपुर्वी सांगून ठेवले आहे. आज आपण या अभियानाच्यानिमित्ताने आलेली संधी साधून प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवू या, जेणे करुन आपला रायगड जिल्हा आपण पूर्ण हरीत करु शकू.या अभियानात जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी , सामाजिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, महिला व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता.
ग्रामपंचायतींना रोपांची उपलब्धता मोफत
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. तथापि सर्व ग्रामपंचायतींना ही रोपे सामाजिक वनीकरण विभागामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी ए.एस. निकत यांनी दिली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या 13 आधुनिक तर अन्य 6 रोप वाटिका आहेत, त्यातून 17 लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध रोपवाटीकांमधून त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रात रोपे पोहोच करण्यासाठी तालुकास्तरावरुन गट विकास अधिकारी व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी यांनी  तयार करण्यात आलेल्या वाहतुक आराखड्यानुसार रोपे पोहोचविण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी रोपे उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक