येत्या 24 तासात अतिवृष्टिचा इशारा



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-  रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात अतिवृष्टी (7 ते 12 सेमी) चा  तर काही ठिकाणी  जास्त अतिवृष्टी (12 ते 24 सेमी) चा इशारा देण्यात आला आहे.  या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असून  दरडग्रस्त व नदी काठावरील  भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे.  अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी  सर्व विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबबे, माती खचणे दी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी  बचाव पथक, बचाव साहित्य,  रुग्णवाहिका, रुग्णालये  आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक  पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरुन पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी  नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. सर्व नियंत्रण कक्षांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी  02141-222118,222097, 222322, 9763646326 या क्रमांकांशी संपर्कात रहावे, असे कळविण्यात आले आहे.
नद्यांच्या पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा
 जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोऱ्यात  मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे.  येत्या 24 तासातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नद्यांची धोका पातळी (कंसात दिलेली) व सध्याची पातळी दुपारी तीन वाजेपर्यंत याप्रमाणे- कुंडलिका (23.95 मि) 24.45 मि., अंबा नदी (9 मि.), 9 मि., सावित्री नदी (6.50 मि) 8.25 मि, पाताळगंगा (21.50 मि.) 21.52 मि., उल्हास नदी (48.77मि)46.25 मि.,  गाढी नदी (6.55 मि) 3.65 मि., भिरा धरण क्षेत्रात दुपारी 3 वा. पर्यंत 64.20 मिमि पाऊस झाला असून पातळी 95.10 मिटर आहे.
या सर्व नद्या व धरणांच्या क्षेत्रात काठावरील गावे, वाड्या रस्त्यांना पूराचा धोका निर्माण होऊ शकतो यादृष्टीने सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
रहदारीवर परिणाम
             आज(दि.7) सकाळ पासून रायगड जिल्हा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे ठिकठिकाणी रहदारीवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीने धोका पातळी गाली असून महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच महाड बाजापेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरले आहे.
      मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या हाय वे वर कलोते भागात रोडवर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस हायवे वरील व जुन्या हायवे वरील वाहतूक संथ गतीने चालू असून सदर ठिकाणी वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
      वाकणकडून पाली कडे जाणाऱ्या पाली पूलावरून पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली आहे. तसेच जांभूळपाडा पूला वरून पाणी वाहत असल्याने खोपोली कडून पाली कडे जाणारा रोड बंद करण्यात आला आहे. मुंबई गोवा हायवे वरील खेड रत्नागिरी येथील भरणा नाका येथील जगबुडी नदीचे पाणी पुलावरून जात असल्याने कशेडी घाटाच्या पुढील रत्नागिरी कडे जाणरी वाहतूक दुपारी 12 वा.पासून बंद करण्यात आली आहे.
     रोहा-नागोठणे रोडवर असलेला अष्टमी पूल येथे पाण्याच्या पातळीत वाढ होत असून त्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
      रायगड जिल्ह्यात सकाळ पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दक्षता घेण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक