स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे जि.प.अध्यक्ष आदिती तटकरे यांचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.24- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2018 ची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्यातील 340 गावांत हे सर्वेक्षण होणार असून या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱ्या जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर  2018 रोजी म.गांधी जयंती दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्वेक्षण कार्यक्रमात सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदितीताई तटकरे यांनी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये देशभरातील सर्व 698 जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्हयांतून 10 गावे याप्रमाणे 6,980 गावांचा समावेश असणार आहे.   देशभरातील एकूण 34,900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण  करण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मक व्यवस्थापन प्रणाली(आयएमआयएस) विकसित करण्यात आली आहे.या प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणांची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हागणदरीमुक्त गावांची पडताळणी,जुन्या शौचालयांचे नवीन बांधकामाची पाहणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणी अंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी,  प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे. स्वच्छाग्राही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येणार येतील. प्रत्येकी तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्राही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमांतून पाहणी केली जाणार आहे.गावाच्या पाहणी  दरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थांपनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या  नावीन्यपूर्ण उपक्रम याचीही पाहणी केली  जाईल.
यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागरूकता,स्वच्छ भारत मिशन बद्दलची  प्रतिक्रिया ,घनकचरा व व्यवस्थापनांचे स्थानिक पुढाकाराने वापरण्यात आलेल्या सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या वतीने  स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2018 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक, विविध संघटना, एन.एस.एस. युनिट, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसंसाधन गट यांनी सहभागी होऊन रायगड जिल्हयांचे नाव अग्रस्थानी राहणेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक