रोजगार मेळावेःभूमिपूत्रांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)26-   त्या त्या जिल्ह्यात होणाऱ्या औद्योगिक विकासात स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, नव्हे तो त्यांचा हक्क आहे, अशीच शासनाची भूमिका राहिली आहे. त्यासाठी शासनाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करुन  या बाबीस चालनाही दिली आहे.  त्यादृष्टीने स्थानिकांना त्या त्या औद्योगिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी  रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचे जिल्हास्तरावर  तसेच औद्योगिक क्षेत्रनिहाय आयोजन करण्यात येणार आहेत.
 त्या त्या जिल्हा कार्यक्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसर जिल्ह्यातील  औद्योगिक क्षेत्रातील मोठे/ मध्यम उद्योग, विविध औद्योगिक संघटना, व्यापारी आस्थापना, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स, बांधकाम व्यावसायिक आदींकडून आवश्यक मनुष्यबळाची निकड, त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कौशल्य आदींबाबत माहिती उद्योग संचालनालय, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग यांनी समन्वयाने  उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योग घटकास आवश्यक मनुष्यबळाची माहिती तसेच सेवा पुरवठादार, उत्पादक  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित करावयाची आहे तर संबंधित जिल्हा उद्योग केंद्र, विभागीय उद्योग सह संचालक यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा बाहेरील क्षेत्रातील उद्योग व आस्थापनांमधील आवश्यक मनुष्यबळ, त्यास आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य आदी माहिती  कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या समन्वयाने प्राप्त करावयाची आहे.
नियोजित रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांमध्ये रोजगारासाठी इच्छूक  युवक युवतींची नोंदणी करणे सोपे व्हावे यासाठी  कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाकडून www.mahaswayam.in  या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील इच्छूक युवक युवती नोंदणी करतील. या माहितीचे विश्लेषण करुन  त्यानुसार जिल्ह्यातील मोठे उद्योग घटक व अन्य आस्थापनांना आमंत्रित करुन मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. या मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांच्या भरती व अन्य समन्वय संनियंत्रणाची जबाबदारी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
प्रस्तावित रोजगार स्वयंरोजगार मेळाव्यांत स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करुन स्वयंरोजगारासाठी आवश्यक  शासनाच्या विविध योजनांची माहिती, विषय तज्ज्ञांचे  मार्गदर्शनही उपस्थित बेरोजगार तरुण तरुणींना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये  विविध विभाग, महामंडळे, वित्तीय संस्था यांचे स्टॉल उभारुन त्या माध्यमातूनही माहिती देण्यात येणार आहे.
या मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय कार्यबल समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात येईल. या मेळाव्यांसाठी  कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज किंवा अन्य औद्योगिक संघटनांनी नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणेही अपेक्षित आहे. या रोजगार मेळावे उपक्रमाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे.
एकंदरीत स्थानिक भूमिपूत्रांचा रोजगाराचा हक्क मिळावा तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना मिळून स्वयंरोजगारालाही चालना देण्यासाठी हे रोजगार स्वयंरोजगार मेळावे उपयुक्त ठरतील.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक