केळवणे येथे शिधापत्रिका वाटपः विकास योजनांचा लाभ घ्या -ना.रविंद्र चव्हाण

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14-  केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण  यांनी आज केळवणे ता. पनवेल येथे केले. आज केळवणे येथे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत खारफुटी बाधित शेतकऱ्यांना शिधापत्रिका वितरण ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास आ.प्रशांत ठाकूर, केळवणे सरपंच अश्विनी घरत, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जिल्हा पुरवठा अधिकारी दुपारे, तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी तेटगुरे, पुरवठा अधिकारी अस्मिता जाधव  तसेच अरुणशेठ भगत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
आपल्या मार्गदर्शनात ना. चव्हाण म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अभिप्रेत असलेल्या डिजिटल क्रांतीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाटचाल करीत आहे.कल्याणकारी कामे करताना शेवटच्या व्यक्तिपर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी भ्रष्टाचार मोडीत काढण्यात आला. त्यामुळे  रेशन दुकानात गरिबांचे धान्य त्यालाच मिळणे शक्य झाले. दुकानदार बाहेर धान्य विकू शकत नाही. या भागात खारजमीन असल्याने धान्य पिकत नाही, म्हणून ग्रामीण भागातील  लाभार्थ्यासाठी असलेला वार्षिक 44 हजार उत्पन्नाचा निकष बदलण्यात आला.हे शासन जनतेच्या विकासाप्रति कटिबद्ध आहे.
यावेळी आ. प्रशांत ठाकूर म्हणाले की,  सरकार संवेदनशील आहे, केळवणे भागातील शेतकऱ्यांचे पिढीजात उत्पन्न बुडाल्यावर त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी निकषामध्ये बदल करून, माझे सरकार माझ्यासाठी काम करेल, हा आत्मविश्वास मिळवून दिला. येथील शेतकर्‍याला त्याची अन्नदात्याची भूमिका बजावू देण्यासाठी शेती जिवंत राहिली पाहिजे याकरिता आपल्या रेतीधंद्यासाठी बंदिस्ती तोडणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.     
या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका आणि धान्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी दुपारे यांनी केले.   

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक