कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)31-  आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी संवाद दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘कातकरी बोलीभाषा अध्ययन साहित्यः शिक्षक मार्गदर्शिका’, तयार केली आहे. ही मार्गदर्शिका शिक्षकांसाठी असून त्यांना ती कातकरी वाड्यांवरील शाळेत कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देतांना उपयुक्त ठरणार आहे.
 रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक गजानन पुंडलिकराव जाधव यांची ही मुळ संकल्पना. ही संकल्पना प्रत्यक्ष शिक्षक मार्गदर्शिका म्हणून मूर्त स्वरुपात साकारली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शिक्षकांना त्यांची बोलीभाषा येत असेलच असे नाही. मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलीभाषेचा प्रयोग केल्यास शिक्षक विद्यार्थी यांच्यात जवळीक निर्माण होते. विद्यार्थ्याला नेमके काय म्हणावयाचे आहे ते समजून घेता येते. शिवाय  शालेय अभ्यासक्रमात प्रमाण भाषेतील शब्दांचे अर्थ जे विद्यार्थ्यांना नीट आकलन होत नाहीत ते त्यांना समजावून सांगता येते.
रायगड जिल्ह्यात सध्या कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर या दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राबविले जात आहे. जिल्ह्यात 1977 गावांपैकी 910 गावांमध्ये कातकरी कुटूंब आहेत. त्यांची संख्या जिल्ह्यात एकून 34 हजार 828 इतकी आहे. तर जिल्ह्यात कातकरी समाजाची लोकसंख्या 1 लक्ष 29 हजार 142 इतकी आहे. कातकरी उत्थान अभियानात कातकरी समाजाच्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विविध शासकीय दाखले देण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन त्यांचे होणारे हंगामी स्थलांतर थांबविण्यासाठी  प्रयत्न होत आहेत. त्यासोबतच त्यांच्या मुलांना बोलीभाषेची जोड देऊन शिक्षण दिल्यास त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, जे शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे कारण ठरते.
 त्यादृष्टीने बोलीभाषा संवादातून शिक्षण ही संकल्पना उपयुक्त ठरते. इयत्ता पहिलीच्या वर्गात येणारा कातकरी समाजाचा बालक हा बोलीभाषेतच म्हणजे कातकरी बोलीत बोलत असतो. त्या अवस्थेत त्याला प्रमाण भाषेकडे नेणे हे शिक्षकांसाठी आव्हान ठरते. या आव्हानाला पेलण्यासाठी शिक्षकांना ही मार्गदर्शिका उपयुक्त ठरणार आहे.
या विद्यार्थ्यांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लावण्यासाठी  बोलीभाषेतून गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे, प्रमाण भाषेतील शब्दांचे अर्थ कातकरी बोलीत समजावून सांगणे या पुस्तिकेमुळे सहज सोपे होणार आहे.  या पुस्तिकेत कातकरी बोलीतील बालगोष्टी, बडबड गीते, दैनंदिन व्यवहारातील वाक्ये, संवाद, वर्णमाला इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील काही घटकांचा कातकरी बोलीतील अनुवाद ,कातकरी- मराठी शब्दसंग्रह देण्यात आला आहे.  अत्यंत आकर्षक स्वरुपात तयार करण्यात आलेली ही मार्गदर्शिका जिल्ह्यातील शिक्षकांना वितरीत करण्यात येत आहे.  त्याचा शालेय शिक्षणात आता कातकरी भागात शिक्षक उपयोग करतील. त्याचा उपयोग होऊन कातकरी समाजाच्या मुला मुलींना शिक्षणाची गोडी निर्माण होईल.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक