राष्ट्रीय महामार्ग क्र.66 पाहणी खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी ना.चंद्रकांत पाटील यांचे निर्देश




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31-  कोकणातील अतिमहत्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव सण 13 सप्टेंबर पासून होत आहे.  गणेशत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून गणेशभक्त येत असतात. या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले.  सायन-पनवेल, पनवेल ते पोलादपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा कार्यक्रम प्रसंगी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तू नवले, उपविभागीय अधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार पनवेल दिपक आकडे, तहसलिदार पेण अजय पाटणे तसेच नॅशनल हायवे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना करतांना ते म्हणाले की, गणेशोत्सवासाठी विविध शहरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त कोकणात येत असल्याने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत जेणेकरुन गणेशभक्तांचा  प्रवास सुखकर होईल.  पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळपणे होईल ते पहावे. कर्नाळा अभयारण्याजवळ महामार्गाच्या कामात येणाऱ्या समस्यांचे  निराकरण करण्यात आले आहे.  महामार्गाच्या कामात विविध टेक्नॉलॉजीचा वापर करुन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे ना. पाटील यांनी सांगितले.
यावेळी ना. पाटील यांनी  पनवेल येथून सकाळी साडेआठ वा. पाहणीस सुरुवात केली. त्यानंतर वाशी नाका, वडखळ नाका या दरम्यान विविध ठिकाणी थांबून रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांना स्थानिक रहिवाशीही भेटण्यास आले. त्यांच्याशीही ना. पाटील यांनी चर्चा केली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक