स्वातंत्र्यदिन समारंभ आपत्तींच्या मुकाबल्यासाठी सुसज्ज व्यवस्था निर्मिती करणार-पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.15- जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव कार्यासाठी सुसज्ज व्यवस्थानिर्मितचे शासनाचे  प्रयत्न असून लवकरच एन.डी.आर.एफ च्या धर्तीवर जिल्ह्यात सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण होईल, अशी घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण  यांनी आज येथे केली. ना. चव्हाण  यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात आपत्तीच्या प्रसंगी मदत व बचाव साधनांच्या उपलब्धतेसाठी तातडीने 30 लाख रुपये देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित या शानदार समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवतीकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीधर बोधे, प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या सह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगान होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ना. चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. ते म्हणाले की, विविध लोकाभिमुख योजना राबवून महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण जनता, महिला या सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने प्रामाणिक प्रयत्न चालवला आहे. विकासाचा समतोल साधण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून  मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे  वर्षभरातच निवडलेल्या 56 गावांमध्ये सामाजिक परिवर्तन दिसून आले, याबद्दल ना. चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 18 हजार 73 शेतकऱ्यांना 41 कोटी 7 लाख 27 हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर 19356 नियमित कर्जफेड करणाऱा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत 1 कोटी 91 लाख 26 हजार रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आला. या कर्जमाफीमुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी पात्र ठरले.  यावर्षी 25 हजार 579 शेतकऱ्यांना तब्बल 129 कोटी 85 लाख 17 हजार रुपयांचे खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले आहे, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करणारे शासन आहे, असा विश्वास ना. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. 
ते पुढ़े म्हणाले की, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान यासारख्या योजनांमुळे कृषि उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.  स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मुद्रा बॅंक योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत 5233 जणांना 64 कोटी 89 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी देण्यात आले. जिल्ह्यातील जनतेला ऑनलाईन दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात पॉईंट ऑफ सेल ( पीओएस) मशीन द्वारे धान्य वितरणास सुरुवात झाली आहे, याबद्दलही ना. चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, साऱ्यांचे सहकार्य व समन्वयाने जिल्हा लवकरच कुपोषण मुक्त होईल.
युवा माहिती दूत उपक्रमात सहभागी होण्याचे युवकांना आवाहन
जिल्ह्यातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजपासून युवा माहिती दूत हा उपक्रम सुरु होत असून जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक युवतींनी त्यात सहभागी होऊन या सेवा उपक्रमाद्वारे उपेक्षित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्या, असे आवाहन ना. चव्हाण यांनी केले. या प्रसंगी ना. चव्हाण यांच्या हस्ते युवा माहिती दूत या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण तसेच पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील मुद्रा बॅंक योजनेतील यशकथांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही अनावरण ना. चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन  गिर्यारोहकांचा सन्मान
या समारंभात ना. चव्हाण यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती, संस्था, विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच आंबेनळी घाटातील दुर्घटनेप्रसंगी मदत व बचाव कार्यात सहभागी झालेल्या गिर्यारोहक युवकांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था आदींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र तसेच जिल्हा प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आंबेनळी घाट दुर्घटना : मदत कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव
1)     श्री.अनिल केळवणे, पदधिकारी महाबळेश्वर ॲडव्हेंचर ट्रेकर्स,
2)     श्री.संजय मधुकर पार्टे, पदधिकारी सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स, महाबळेश्वर
3)     श्री.अमित कोठावळे, पदधिकारी सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू, भोर जि.पुणे
4)   डॉ.राहुल वारंगे पदधिकारी सह्याद्री मित्र मंडळ महाड
5)    श्री.बी.जगनमोहन नायडू, प्रोजेक्ट मॅनेजर, एल.अँड टी.कंपनी
6)     श्री.राहुल समेळ, पदधिकारी ठाणे ट्रेकर्स ग्रुप ठाणे.
7)    श्री.प्रसाद गांधी, मदत फाऊंडेशन खेड
8)    डॉ.राजेंद्र पाटील, यंग ब्लड ॲडव्हेंचर महाड
9)     श्री.दर्पण दरेकर, दर्पण दरेकर मित्र मंडळ पोलादपूर
10) श्री.महेश सानप, वाईल्डर वेस्ट ॲडव्हेंचर कोलाड
11) श्री.राजेश बुटाला, युथ कल्ब महाड
12) श्री.सचिन गायकवाड, मानाचा गणपती आपत्कालीन सेवा दापोली
यावेळी ना. चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे याप्रमाणे-
 पोलिस पदक
पेण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन केशवराव जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक सन्मानचिन्ह देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) 2017-18 इ.10 वी साठी
1)     संकेत राजेंद्र पोतदार, डे.ए.व्ही.पब्लिक स्कूल प्रायमरी इंजिनिअर
2)     फेहमीन फर्झन देशमुख, समर्थ रामदास सेंकडरी
3)     दीप सुशिल गांधी, को.ए.सो.इंग्लिश मिडी.सेकंडरी स्कूल
4)   अलौकिक कुमार वर्मा, डे.ए.व्ही.इंटर स्कूल खारघर
5)    साक्षी संजय ए.पाटील, अपीजय स्कूल खारघर
6)     चेतन केशव घोडके, अपीजय स्कूल खारघर
7)    अखील अनिल अहिरे, बालभारती पब्लिक स्कूल खारघर
8)    श्रीष्टी रमेश दारकुंडे, श्रीम. सुमतीबाई देव प्रायमरी स्कूल
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी)फेब्रुवारी 2018 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1)     कु.श्रेयस राहुल पाटील, सेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई पनवेल-इयत्ता 5 वी
2)     कु.अथर्व संभाजी खोत, रायगड जिल्हा परिषद स्कूल रिंगीचा कोंड-इयत्ता 5 वी
3)     कु.सिध्देश संजय पाटील, एन.एम.जोशी विद्याभवन गोरेगाव इयत्ता 8 वी
जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष सन 2017-18
1)     कु.कुथे भागेश जगदिश, खेळ : जलतरण (वॉटरपोली)
गुणवंत खेळाडू पुरस्कार (दिव्यांग) सन 2017-18
1)     कु.देवकर विनोद सुरेश खेळ-पॉवरलिफ्टिंग
गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) सन 2017-18
1)     कु.गुगळे राजश्री राजू, खेळ : जलतरण (वॉटरपोली)
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सन 2017-18
श्री.देसाई संदिप परशुराम खेळ-कबड्डी
जिल्हा युवा पुरस्कार सन 2017-18
कु.सोनू मच्छिंद्र पाटील (युवती)
जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) सन 2017-18
वनवासी आदिवासी विकास सेवा संघ माजगाव ता.मुरुड
प्री वॉटर कप स्पर्धा-2018
1)     मौजे देवळे ता.पोलादपूर
2)     मौजे आडावळे खुर्द ता.पोलादपूर
3)     मौजे कापडे बुद्रुक ता.पोलादपूर
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक