गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी


        
                                                                                                                                                                                  
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)2-जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असून त्यासाठी समाजातील डॉक्टर्स, शाळा, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था या सगळ्यांचा सहभाग शासकीय यंत्रणेसोबत असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज मिजल रुबेला गोवर लसीकरण अभियान राबविण्यासंदर्भात  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   या कार्यशाळेचे  उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.बडगिरे तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरुण काटकर, तालुका आरोगय अधिकारी, नगर पालिकांचे आरोग्य अधिकारी तसेच सहभागी यंत्रणाचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
या अभियानात राष्ट्रीय स्वास्थ मिशन, भारतीय बालरोग तज्ज्ञ संस्थान, भारत सरकार आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, लायन्स इंटरनॅशनल, सार्वजनिक आरोग्य विभाग आदि संस्था-संघटना सहभागी आहेत.  यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण काटकर  यांनी सादरीकरणाद्वारे राबविण्यात यावयाच्या अभियानाच्या विविध पैलूंची माहिती दिली.   येत्या 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.  जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील सुमारे साडे सहा लाख बालकांना रुबेला-गोवर  लसीकरण करण्याचे नियोजन आहे.  त्यासाठी सर्व शाळा, अंगणवाड्या (खाजगी व शासकीय ) मधून लसीकरण राबवून नंतर गावा-गावात व घरोघरी जाऊन लसीकरण राबविण्यात येणार आहे.  बालकांच्या नियमित लसीकरणासोबत हे लसीकरण करता येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 
याप्रसंगी अंबेनळी दुर्घटना प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य करणारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.भाग्यरेखा पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनावणे यांचा जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गोवर रुबेलाबाबत महत्वाची माहिती
लहान वयाच्या मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे.  गोवर या आजाराची बाजारामध्ये किफायतशीर आणि सुरक्षित लस उपलब्ध असली तरी  लहान वयाच्या मुलांमध्ये या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.  सन 2015 मध्ये जगभरात जवळपास 1.35 लक्ष मृत्यू हे केवळ गोवर या आजारामुळे झाले आहेत म्हणजे दररोज 367 मृत्यू किंवा दर तासाला 15 मृत्यू जगभरात गोवरमुळे होत आहेत.  गोवर लसीकरणामुळे सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये जगभरात गोवर या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण 79 टक्के पर्यंत कमी झाली.  सन 2016 सालच्या जागतिक आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे होणाऱ्या मृत्यू पैकी अंदाज 37 टक्के मृत्यू हे भारतामध्ये झाले आहेत.  गोवरच्या लसीकरणामुळे  सन 2000 पासून सन 2015 पर्यंत सुमारे 2 कोटी बालकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे.   रुबेला हा एक संक्रामक, सामान्यत: सौम्य व्हायरल संसर्ग असून तो मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो.  गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष ( जसे की, अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय विकृती) होऊ शकतो.  हे बालक जन्मजात रुबेला सिंड्रोम (सीआरएस) म्हणून ओळखले जाते.  जगभरात दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त बालकांची सी.आर.एस.सह जन्म होतो.  रुबेलासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु हा रोग लसीकरणाने प्रतिबंधित करता येतो.  दरवर्षी अंदाजे 40 ते 50 हजार जन्मजात रुबेला सिंड्रोम (सीआरएस) केसेस भारतामध्ये होतात.  मोहिमेसाठी लक्ष्य करण्यात आलेला वयोगट 9 महिने ते 15 वर्षाखालील विद्यार्थी.  फक्त एकदा मोहिमेमध्ये लसीकरण करुन गोवर आणि रुबेला या दोन आजारांपासून आपल्या बालकांना सुरक्षित करुन शकता.  (जरी यापूर्वी देखील आपण आपल्या बालकास गोवर रुबेलाचे लसीकरण केले असेल तरी मोहिमेमध्ये लसीकरण करणे अनिवार्य आहे.)  भारतामध्ये गोवर रुबेला लसीकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2017 पासून सुरु करण्यात आली आहे.  यामध्ये जवळपास 9 कोटीहून अधिक बालकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्यात ही मोहिम नोव्हेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.   लसीकरणासाठी 9 महिने ते 15 वर्षाखालील पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. 
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक