दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे ही समाजाची जबाबदारी-ना.नितीन गडकरी



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.24-  आपल्या देशात 5 व्यक्ती दिव्यांग आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे ही समाज म्हणून आपल्या साऱ्या सुदृढ म्हणवणाऱ्या समाजाची जबाबदारी आहे, असे, प्रतिपादन केंद्रीय भुतल परिवहन, जहाजबांधणी विभाग, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज पेण येथे केले.
पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट दामोदर नगर,चिंचपाडा या संस्थेच्या सुमंगल मतिमंद व बहूविकलांग मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या तसेच ए.डब्ल्यू.एम.एच.महाराष्ट्र यांच्या संयुक्त् विद्यमाने शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे (मोफत सेवा)(Early Intervention Free Services Center) उद्धाटन ना.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
            या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अजय पाटणे, एम्पथी फाऊंडेशनचे सुगलचंद जैन,  शांतीलाल छेडा, रमेश दमानी, प्रवीण छेडा, ए.डब्ल्यू.एम.एच.महाराष्ट्र अध्यक्ष श्रीरंग बिजूर, कपिल खंबडीया, सुनील विश्वकर्मा, सुंदरेश्वर आदी मान्यवर   उपस्थित होते.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी ना.गडकरी यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. त्यांनतर उपस्थित मान्यवरांनी शाळेची पाहणी केली. त्यांनतर सभामंडपात शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली.
तसेच विद्यार्थिनींनी मान्यवरांच्या हातावर राखी बांधून रक्षा बंधन केले.
यावेळी बोलताना ना.गडकरी म्हणाले की, विशेष मुलांचा सांभाळ करणे ही कठीण बाब आहे. या मुलांचे संगोपन करताना, शिक्षण देतांना त्यांच्यावर प्रेमाने संस्कार करणे आवश्यक असते. अशाप्रकारे संस्कारित मुलांमधील अंगीभूत कौशल्य ओळखून त्यांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले पाहिजे. ही शासन, कुटुंब, समाज या साऱ्या घटकांची जबाबदारी आहे.ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून आपण दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो. त्यासाठी समाजातील सुदृढानी संवेदनशील असणे आवश्यक आहे. यावेळी ना.गडकरी यांनी या संस्थेच्या कार्यासाठी जेएनपीटी च्या सामाजिक उत्तरदायित्व निधितून एक कोटी रुपयांची देणगीही जाहीर केली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सुहित जीवन ट्रस्टच्या सुरेखा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. नाट्य कलावन्त अभय पैर व राहुल कवतिके यांनी सूत्रसंचालन केले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक