कृषी पणन मंडळाची काजू बी तारण योजना



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- : राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष ना.सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाने काजू बी तारणचा दर रुपये 80/- प्रती किलो वरुन रुपये 100/- प्रती किलो केला तसेच शेतमाल तारण योजनेत सुपारी पिकाचा समावेश करुन तारण कर्जाचा दर रुपये 100/- प्रती किलो असोली सुपारीसाठी केला.   यामुळे कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेत कोकणातील शेतक-यांनी पहील्यांदाच 72.68 मे.टन काजू बी तारणात ठेवली.  या पोटी कृषी पणन मंडळाने शेतक-यांना रु.72.68 लाख तारण कर्ज वाटप केले आहे. 
                कृषी पणन मंडळ शेतमाल तारण योजना 1991 सालापासून राबवित असून या योजने अंतर्गत तूर,मुग,उडीद,सोयाबीन,सुर्यफुल,चना,भात(धान),करडई,ज्वारी,बाजरी,मका,गहु,काजू बी,बेदाणा,हळद,सुपारी या शेतीमालावर शेतक-यांना तारण कर्ज देण्यात येते.   शेतमालाच्या त्या दिवशीच्या बाजार भावाच्या 75 टक्के रक्कम 6 टक्के व्याज दराने 180 दिवसासाठी शेतक-यांना देण्यात येते.    यामुळे शेतक-यांना आपला माल तात्काळ विक्री न करता पैसे उपलब्ध होतात तसेच भविष्यात शेतमालाच्या बाजार भावात होणा-या वाढीचा फायदा शेतक-यांना मिळतो.
कोकणात उत्पादित होणा-या काजू बी साठी गेल्यावर्षी पर्यंत प्रती किलो रु.80/- प्रमाणे तारण कर्ज देय होते.  काजूच्या भावात होत असलेली वाढ तसेच रु.80/- प्रती किलो तारण कर्जास शेतक-यांचा मिळत नसलेला प्रतिसाद विचारात घेवून ना.सुभाष देशमुख मंत्री,सहकार व पणन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित काजू बी चा दर रु.100/-प्रती किलो पर्यंत करण्यात आला.   तसेच कोकणातील सुमारे 9 ते 10 तालुक्यामध्ये घेतल्या जाणा-या सुपारी फळ पिकासाठीही शेतमाल तारण योजना लागू करण्यात आली असून         न सोललेल्या सुपारी (असोली) साठी रु.100/-प्रती किलो तारण कर्ज देण्याचा निर्णय कृषी पणन मंडळाने घेवून सुपारी पिकाचा तारण कर्जात समावेश केला आहे.
                  कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय, रत्नागिरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती,रत्नागिरी चे सभापती मधुकर दळवी यांनी काजू उत्पादकांसाठी विविध ठिकाणी बैठका घेवून तारण योजने बाबतची माहिती शेतक-यांना दिली.   सदर बैठकीमधील शेतक-यांचा प्रतिसाद पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामिण भागातील काही गोदामे निश्चित करुन सदर गोदामांच्या उपलब्धतेसाठी करार केला तसेच गोदामांचा विमा काढला.           सन 2018 च्या मे आणि जून महिन्यामध्ये शेतक-यांनी काजू बी तारणात ठेवली.   या हंगामात कोकणातील एकूण 14 शेतक-यांनी 72.68 मे.टन काजू बी तारणात ठेवलेली असून या पोटी बाजार समितीने शेतक-यांना अदा केलेल्या रकमेची प्रतीपूर्ती कृषी पणन मंडळाने बाजार समितीस केलेली आहे.
                  शेतमाल तारण योजनेत शेतक-यांनी काजू बी ठेवली त्यावेळी  काजू बी चा दर रु.135 ते 140 प्रती किलो पर्यंत होता.  भविष्यात  वाढणा-या दराचा फायदा शेतक-यांना होणार असून सदर योजना पुढील वर्षी रत्नागिरी,सिंधुदुर्ग,भिवंडी,मुरबाड,शहापुर,महाड,माणगाव,पेण,रोहा,मुरुड,अशा एकूण 10 बाजार समित्यांमार्फत काजू, सुपारी आणि भात पिकांसाठी  शेतमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे.   यामध्ये रु.310.00 लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यामुळे काजू, सुपारी आणि भात  उत्पादकांना निश्चितपणे दिलासा मिळेल.   कोकणात पहिल्यांदाच शेतमाल तारण योजनेची अंमलबजावणी कृषि पणन मंडळाचे विभागीय कार्यालय,रत्नागिरीच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीने केली असल्याची माहीती कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री.सुनिल पवार यांनी  दिली.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक