मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम मतदार नोंदणीसाठी जनजागृती आवश्यक -उपजिल्हाधिकारी श्रीम.वैशाली माने


     

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-  आगामी सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याकरिता मतदार नोंदणीसाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम.वैशाली माने यांनी यावेळी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम संदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत त्याबोलत होत्या.
           यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मतदार यादी अद्ययावत व जास्तीत जास्त शुध्द स्वरुपात व्हावी यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व बीएलओ यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.  मतदार यादीतील तफावतींचा शोध घेण्यात आला असून या तफावती दूर करण्यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात आलेल्या आहेत.  मयत,दुबार व स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.  मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून मा.भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी रायगड जिल्ह्यातील प्रस्तावांस मंजूर दिली आहे.  त्यानुसार रायगड जिल्ह्यात एकूण 2 हजार 693 मतदान केंद्र अस्तित्वात आहेत.   मतदान केंद्राची शंभर टक्के पडताळणी झालेली आहे.  दिव्यांग पात्र व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करणे, त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करणे, महिला मतदारांचे प्रमाण वाढविणे यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  युवा मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी हायस्कूल व महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा इत्यादीची स्थापना करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकांवर आधारित सैनिक मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.  मा.भारत निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक करिता M3 बनावटीच्या नवीन EVM (बी.यु.5721 व सी.यु.3326) रायगड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या आहेत.  तसेच VVPAT  मशीन्स ह्या 20 सप्टेंबर पर्यंत प्राप्त होणार आहेत.    दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 21 लाख 54 हजार 372 स्त्री-पुरुष मतदार आहेत.  या मतदारपैकी ब्लॅक-व्हाईट छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या 2 लाख 37 हजार 119 आहे व मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 1 लक्ष 23 हजार 522 अशी आहे.  सदर मतदरांकडून रंगीत छायाचित्र स्विकारुन ERONET मध्ये त्यांचे अद्ययावतीकरणाचे काम निरंतर सुरु आहे.  ऑनलाईन मतदार नाव नोंदणीचे काम मोठया प्रमाणावर होत आहे.  नवीन मतदार नोंदणी झालेल्या 94021 मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आलेले आहेत.  तसेच मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे eci.nic.in या संकेतस्थळावर व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे ceo.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध www.nvsp.in या लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करता येईल.
कार्यक्रम
        प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 01 सप्टेंबर 2018.  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 01 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018.  दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी दि.30 नोव्हेंबर 2018 पूर्वी.  डाटा बेस अद्यावतीकरण व पुरवणी यादीची छपाई दि. 03 जानेवारी 2019 पूर्वी.  अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दि.04 जानेवारी 2019

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक