अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे लोकार्पण टेलिमेडीसीन द्वारे जिल्ह्यातील आरोग्यसेवांचे बळकटीकरण करणार- ना. रविंद्र चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-  रायगड जिल्हा हा सागरी,डोंगरी आणि नागरी अशा तिनही वैशिष्ट्यांनी नटलेला व मोठा भूभाग असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणे ही दुर्गम आहेत. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा टेलिमेडीसिन व्यवस्थेशी जोडून बळकट करण्यात येईल व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन येथील रुग्णांना उपलब्ध करुन देऊ, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण  यांनी आज येथे केले.
 ना. चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) लोकार्पण करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. पंडीतशेट पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. देवकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात आगामी काळात आणखीन तीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह उभारणी होणार आहे.  त्यात आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सुसज्ज यंत्रणा उपलब्ध असेल.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांनी माहिती दिली की,  जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण उपक्रमांच्या निधीतून हे शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले आहे. येत्या वर्षभरात जिल्ह्यात श्रीवर्धन, पेण, अलिबाग येथेही अशी शस्त्रक्रियागृह उभारण्यात येतील.
यावेळी  जिल्हा रुग्णालयातील परिचारिका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींनी व्यसनमुक्ती याविषयावर पथनाट्य सादर केले.
शासन रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचाही पुनरुच्चार ना. चव्हाण यांनी यावेळी केला. डॉ. गवळी यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक