सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मुंबईसह नागपूरमध्ये मंगळवारी पेन्शन अदालत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे मंगळवार दि. 18 रोजी पेन्शन अदालत  आयोजित करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळीउपस्थित रहावे,असे आवाहन वित्त विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या दि. 18 जुलै 2018 रोजीच्या ज्ञापनान्वये देशभरात सर्व राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेन्शन अदालत आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अशा पेन्शन अदालतीचे मंगळवार दि. 18 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल. 
मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालतीचे काम सकाळी 10.30 ते पूर्ण दिवस असे चालणार आहे. याचे स्थळ पु.ल. देशपांडे  महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई असे आहे.
दुसरी पेन्शन अदालत नागपूर येथे आयोजित होईल. तिचा वेळ सकाळी 9 ते पूर्ण दिवस असा आहे तर स्थळ साई सभागृह, गांधी नगर, नागपूर असे आहे.
महालेखाकार, मुंबई कार्यालयामार्फत प्राप्त झालेली प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांची यादी www.mahakosh.gov.in  या संकेतस्थळावर  Circulars and orders  या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालय प्रमुखांना या यादीतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणाची पडताळणी करावी, कार्यालय प्रमुखांनी या प्रकरणांमधील त्रूटीची पुर्तता करून पेन्शन अदालतमध्ये उपस्थित राहावे तसेच संबंधित सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी यांनाही उपस्थित राहण्यासाठी कळवावे असे या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ज्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा निवृत्ती वेतन प्रकरणाबाबत तक्रारी आहेत, त्यांनी त्यांच्या तक्रारी संबंधित प्रशासकीय विभागात लेखी किंवा ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे दि.18 पूर्वी नोंदवाव्यात तसेच पेन्शन अदालतीस उपस्थित राहावे असेही वित्त विभागाने कळवले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक