सोमवारपासून कुष्ठरोग शोध अभियानास सुरुवात



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान-2018-19’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत करावयाच्या कामकाजाबाबतचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. 
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर आदि उपस्थित होते.  यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ.प्राची नेहुलकर यांनी सादरीकरणाद्वारे  माहिती दिली.   यावेळी मोहिमेची दि.24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीतली रुपरेषा सांगितली.  या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.  तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.  या अभियानात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल. 
असे होणार सर्वेक्षण व तपासणी
जिल्ह्यातील ग्रामिण भागात व शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करुन प्रत्येक घरातील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल.  एका पथकात एक पुरुष व एक महिला असे दोन सदस्य असतील.  जे अनुक्रमे पुरुष व महिलांची  तपासणी करतील.  एक पथक दिवसभरात ग्रामीण भागात 20 तर शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करतील.  रायगड जिल्ह्यात 21 लाख 56 हजार 885 लोकसंख्येचे सर्वेक्षण होईल.  तब्बल 4 लाख 88 हजार 183 घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरातील सदस्यांची तपासणी करण्यासाठी 1718 पथके तयार करण्यात आली आहेत.  यात ग्रामीण भागात 19 लाख 92 हजार 114 तर शहरी भागातील 1 लाख 64 हजार 771 जणांची तपासणी होईल, अशी माहिती देण्यात आली.  तरी नागरिकांनी या अभियान कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून आपली व आपल्या कुटूंबियांची तपासणी  करुन घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक