आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरिबांसाठी ही योजना वरदानच- ना.रविंद्र चव्हाण




 अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.23: जनता सदृढ रहावी, त्यांचे आरोग्य चांगल रहाव हा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यामागे शासनाचा उद्देश आहे. गरीबांसाठी ही योजना वरदान असून याचा लाभ अधिकाअधिक जनतेपर्यंत पोहचवावा, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज कर्जत येथे केले.  कर्जत येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्जत कृषी संशोधन केंद्र हॉल येथे आज आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला व लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप करण्यात आले.  त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते.
            यावेळी सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा श्रीमती रजनीताई गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील 1 लाख 41 हजार कुटूंबाना ई-कार्ड मिळणार आहेत. याआधी राज्यशासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत होती. ज्यामध्ये गरीबांना विविध आजारांवर नि:शुल्क उपचार सेवा देण्यात येत होती. आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवर लाभार्थ्यांना नि:शुल्क उपचार घेता येणार आहे. या दोन्ही योजना एकत्रित राबविण्यात येणार आहेत. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय गणनेच्या आधारे ग्रामीण भागामध्ये घर नसलेली कुटूंब,स्वच्छता कर्मी, कंत्राटी कर्मचारी तसेच शहरी भागातील फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर,गवंडी, रंगकाम करणारे, माळीकाम करणे, मदतनीस, सायकल रिक्षा ओढणारे आदि लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जनता सदृढ रहावी, त्यांचे आरोग्य चांगल रहाव हा आयुष्मान योजना राबविण्यामागे शासनाचा महत्वाचा उद्देश आहे. गरीबांसाठी ही योजना वरदान असून याचा लाभ अधिकाअधिक जनतेपर्यंत पोहचला पाहिजे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे, असे ना.चव्हाण यांनी सांगितले.
            पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
ई-कार्ड चे वाटप
            यावेळी मा.पालकमंत्री महोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमती हेमलता हरिश्चंद्र माळवी, श्रीमती वंदना गोविंद गिरी, दत्ताराम धर्मा म्हात्रे, श्रीमती रेखा कृष्णा घोसाळकर, कृष्णा गोंदिवले, रवि गुरुनाथ पवार, विवेक हरिश्चंद्र माळवी, श्रीमती कुसुम मारुती गिरी यांना प्रातिनिधिक स्वरूपात ई-कार्ड वाटप करण्यात आले. तद्नंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमा आधी रांची येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक