भात पिकः किड नियंत्रण; कापणी व कापणी पश्चात व्यवस्थापन



        सध्या भात पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. पावसाची उघडीप असल्याने उपलब्धते नुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाढते न व आद्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमीनित हळव्या जातीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लष्करी अळी ढळल्यास दिलेल्या शिफारसीप्रमाणे फवारणी करावी. तसेच   भातावर किंवा भाजीपाला व इतर पीकावर फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी.
        लष्करी अळी : या किडीच्या अळ्या दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात. पाने कडेपासून मध्यशिरेपर्यंत खात जात असल्यामुळे नुकसानीवरून कीड चटकन ओळखून येते. किडीचा खरा उपद्रव मात्र पीक काढणीच्यावेळी होतो. या किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.
        नियंत्रणाचे उपाय:- पीक तयार होताच कापणी करावी, सकाळी किंवा संध्याकाळी चुडांचे निरीक्षण करावे 4 ते 5 अळ्या प्रती चौ.मि आढळताच संध्याकाळच्या सुमारास डायक्लोरोव्हॉस 76 WSP 1.3 मीली प्रती लिटर पाण्यातुन चुडाच्या बुंध्यावर पडेल असे फवारावे. एकरी 3 ते 4 पक्षी थांबे बसवावेत.पक्षी अळ्या नष्ट करतात. बांध स्वच्छ ठेवावेत.
          भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून धसकटे वेचून नष्ट करावीत. नांगरणी केल्यामुळे किडीच्या सुप्तावस्था प्रखर सूर्यप्रकाशामुळे तसेच पक्ष्यांमुळे नष्ट होतात. अळीचे संक्रमण रोखण्यासाठी शेताच्या बाजुला दोन फूट खोल चर खणावेत. शेताच्या बांधावरील गवत काढावे. शेतातील बेडूक मारू नयेत, कारण बेडूक हा या किडींचा नैसर्गिक शत्रू आहे.
          तुडतुडे: ही कीड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि जेथे नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्या जातात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येते. मादी तुडतुडे त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत. जरी पडल्याच तर दाने पोचट होतात.
           नियंत्रणाचे उपाय:- कीड नियंत्रणासाठी कीड प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर एका बुंध्यावर 5 ते 10 तुडतुडे असतील तर किटकनाशकांचा वापर करावा. फवारणीसाठी 10 लिटर पाण्यातून ॲसिफेट 75 टक्के 14 मिली. किंवा  फिप्रोनिल 5 टक्के 20 मिली किंवा इमिडाक्लोरोप्रिड 17.8 टक्के 2 मिली. फवारावे. किटकनाशकाचा फवारा बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. 
     निळे भुंगेरे नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 2.5 टक्के 6 मीली प्रती 10 लीटर पाण्यात प्रमाणे फवारावे.
     करपा व्यवस्थापनासाठी ट्रायसायक्लोझोल 75 टक्के पाण्यात मीसळणारी भुकटी 6 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातुन फवारावे.शेतात पक्षी थांबे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे याव्दारे किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे हो शकते.
किटक नाशके फवारतांना घ्यावयाची काळजीः किटकनाशके नाका, तोंडात त्वचेवर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. काही लक्षणे ढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. किटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या नष्ट कराव्यात. लहान मुलांपासुन कीटकनाशके दुर ठेवावीत.
      कापणी पश्चात व्यवस्थापनः-भात पीक कापणी नंतर गवताचा नायनाट करावा. भात कापणी करताना वैभव विळ्याचा वापर करावा. किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास निश्चितच होणारे नुकसान टाळता येणे क्य आहे.
       भात कापणीची योग्य वेळ : भात कापणीची वेळ ही भरडणीसाठी महत्त्वाची ठरते. भात पीक कापणी झाल्यानंतर जास्त दिवस शेतात ठेवल्यास भरडणीनंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण जास्त होते. कारण दिवसाचे वाढते तापमान रात्रीचे कमीत कमी तापमान तसेच त्यावर पडलेले दवबिंदू या तफावतीमुळे भात दाण्यास तडा जातो. त्यामुळे भरडणीनंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण वाढते. यासाठी भात जातीची योग्य वेळी म्हणजे लोंबीतील 90 ते 95 टक्के दाणे पक्व झाल्यानंतर आणि लोंबीतील काही दाणे पिवळसर हिरवट असताना कापणी करावी. कापणीनंतर त्याच किंवा दुसऱ्या दिवशी मळणी करावी. ओला पेंढा स्वतंत्र वाळवावा.
            नियंत्रित वाळविणे : कापणीनंतर भात नियंत्रित परिस्थितीत उन्हाखाली किंवा यंत्राच्या सहाय्याने वाळवावा अतिशय कडक तापमानात दाण्याच्या पृष्ठभागावरील आर्द्रता तेवढ्या कमी कालावधीत पृष्ठभागावर स्थलांतरीत होण्यास असमर्थ ठरते. अशा परिस्थितीत पृष्ठभागावरील तापमान दाण्यातील आर्द्रता या तापमानातील तफावतीमुळे दाण्याला तडे जातात अशाप्रकारे वाळविलेले दाणे भरडणी करताना हमखास तुटतात.
        भरडणी करतेवेळी भातातील पाण्याचे प्रमाण : भरडणी वेळी दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण दाण्याच्या बळकटीच्या गुणधर्माच्या व्यस्त असते. जेवढे भातातील आर्दतेचे प्रमाण जास्त तेवढा दाणा जास्त कमकुवत असतो. अशा प्रकारचा भात सहज तुटतो. साधारणत: भात भरडताना भातामध्ये 12 ते 14 टक्के आर्द्रतेचे प्रमाण असणे आवश्यक असते. जर यापेक्षा भातात आर्द्रतेचे प्रमाण कमी असेले तर भरडणीवेळी भात दाणा साफ होतो परिणामत: तुटीचे प्रमाण कमी होते.
       भाताची योग्य साठवण : गोदामात भाताची साठवणूक करत असताना भातावरील आर्द्रतेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असणे आवश्यक असते. जर यापेक्षा आर्द्रतेचे प्रमाण जास्त असेल तर भातास किडी बुरशी लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत किडीच्या बुरशीच्या उपद्रवामुळे भातास इजा होते त्यामुळे भात भरडल्यानंतर कणीचे प्रमाण वाढते. तसेच गोदामात भात साठवला असताना आर्द्रतेचे प्रमाण तापमानात अतिशय जास्त तफावत असते, अशा वेळीही भातास तडा जातो. त्यामुळेही भात भरडताना कणीच्या प्रमाणात वाढ होते.
भात पीक 90 ते 95  टक्के तयार होताच कापणी करावी पावसाचा अंदाज पाहुन कापणी करावी व भात सुरक्षिठिकाणी ठेवावे,असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी खोपोली यांनी केले आहे. 
00000
संकलनः जिल्हा माहिती कार्यालय रायगड- अलिबाग  


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक