मिझल्स-रुबेला लसीकरण मोहिम: तालुकानिहाय आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी


अलिबाग, जि.रायगड दि.28,(जिमाका) – मिझल्स रुबेला लसीकरण मोहिम ही सुदृढ व आरोग्य संपन्न भावी पिढीसाठी राबविली जात आहे. तरी हि मोहिम राबविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ग्रामीण, तालुका, शहर स्तरावर नियोजन करावे व या लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून मिझल्स रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यात वय 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील बालके, मुले यांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व स्तरावर तयारी सुरु आहे. या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आयोजित बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सांबरे व शिक्षण विस्तार अधिकारी आदि उपस्थित होते.
या अभियाना संदर्भात आतापर्यंत जिल्ह्यात दि. 2 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा कृतीदल स्थापन करुन त्या मार्फत विविध पातळीवर मोहिमेची तयारी व जनजागृती करण्यात येत आहे. त्यात तालुकास्तरीय प्रशिक्षणे, सुक्ष्म नियोजन बैठका, शालेय शिक्षण विभागाच्या कार्यशाळा, खाजगी डॉक्टरचे प्रशिक्षण व बैठका अशा विविध पातळ्यांवर तयारी सुरु आहे. या सर्व झालेल्या कामांचा आढावा डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला.
यावेळी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत लसीकरण पोहोचावे या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. तालुकास्तरावरुन प्रत्येक गावपातळीवर राबवावयाच्या लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे. त्यानुसार लसी, अन्य आवश्यक साहित्य व मनुष्यबळाचे नियोजन मिशन मोडवर करुन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड