जि.प. तपासणी अहवाल वाचन: गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्या- डॉ.जगदिश पाटील


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- जिल्हा परिषद ही ग्रामिण जनतेला सेवा देणारी संस्था आहे. ग्रामीण जनतेचा विकास करण्यासाठी जि.प.प्रशासकीय यंत्रणेने गुणवत्तापुर्ण प्रशासनावर भर द्यावा,असे निर्देश कोकण विभागाचे आयुक्त डॉ.जगदिश पाटील यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात आज रायगड जिल्हा परिषदेच्या वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप आयुक्त (आस्थापना)  गणेश चौधरी, उपआयुक्त (विकास)  भारत शेंडगे, उपआयुक्त (तपासणी)  नारायणसिंग परदेशी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण,उप मुख्य् कार्यकारी अधिकारी (साप्रवि) निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा स्वच्छता)  साळुंखे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. यावलकर यांनी जिल्हा परिषदेने राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर ऑगस्ट 2018 अखेर तपासणी   अहवालाचे वाचन करुन आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने सेवाविषयक बाबी, लेखा,विविध योजनांची अंमलबजावणी  व खर्च विषयक बाबी आदींचा आढावा घेण्यात आला. तपासणी अहवालात नोंदविलेल्या आक्षेपांबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्तता करावी, असे निर्देश डॉ.पाटील यांनी संबंधितांना दिले.
यावेळी डॉ.पाटील म्हणाले की, शाश्वत विकासासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या हेतूने सर्व यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण जनतेला देत असलेल्या  सेवेची गुणवत्ता ही दर्जेदार असावी, अशी अपेक्षा डॉ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोकणच्या विकासासाठी पर्यटन आणि फळबाग लागवड या दोन क्षेत्रांना सर्वाधिक प्राधान्य असले पाहिजे. गावात रोजगार नाही, या सबबीमुळे कुणावरही स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)  निखिल ओसवाल यांनी आभारप्रदर्शन केले.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक