त्सुनामी आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम बोर्ली-मांडला ग्रामस्थांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे





अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- राष्ट्रीय आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली  व भारतीय राष्ट्रीय समुद्रीय माहिती सेवा केंद्र, हैदराबाद (Indian  National  Center  for  Ocean  Information  Service  Hyderabad ) यांच्या  मागदर्शनाखाली  त्सुनामी या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या  भाग म्हणून जिल्ह्यात बोर्ली मांडला ता. मुरुड येथे जिल्हा प्रशासनातर्फे रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.  या सराव उपक्रमात जिल्हा प्रशासनाच्या 18 विभागांच्या 267 अधिकारी कर्मचाऱ्यांसह बोर्ली-मांडला येथील नागरिकांनी सक्रीय सहभाग दिला. आजच्या या सराव सत्रात बोर्ली मांडला येथील ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवले.
मंत्रालय- जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ते बोर्ली मांडला
 हैदराबाद येथील संस्थेतून सकाळी अकरा वाजता पहिला त्सुनामी संदर्भात पहिला संदेश हा मंत्रालयात नियंत्रण कक्षात आल्यानंतर तेथून हा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियंत्रण कक्षात आला.  त्यानंतर मुरूड तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात येऊन तो बोर्ली- मांडला येथील नियंत्रण कक्षात संदेश पोहोचला. बोर्ली समुद्र किनाऱ्यावरील साई मंदिरपासून त्सुनामी रंगीत तालीम (मॉक ड्रिल) कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  बोर्ली गावात भोंगा (सायरन) वाजवून  सूचना देण्यात आली.  यावेळी प्रथम सर्व यंत्रणांना तहसिलदार उमेश पाटील यांनी सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या. किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.  त्यानंतर गावातील सर्व नागरिकांना आवाहन करुन गाव खाली करण्यास सांगण्यात आले.  त्यांना सुरक्षित स्थळी म्हणजेच शासकीय गोदाम मांडला येथे स्थलांतरीत करण्यात आले. यासाठी प्रशासनाने जुनाबाजार बोर्ली नाका येथून वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून नागरिकांना शासकीय गोदाम मांडला येथे सुरक्षित पणे नेण्यात आले. तसेच समुद्र किनाऱ्यावर व गावातील गोठ्यांमध्ये असणाऱ्या पाळीव जनावरांना  बाहेर काढण्यात आले.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडला येथे वैद्यकीय तपासणी केंद्र व ग्रामपंचायत मांडला येथे पशुवैद्यकीय सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली होती. बोर्ली गावातील वयोवृध्द नागरिकांना घरातून स्ट्रेचरद्वारे वाहनापर्यंत व तेथून सुरक्षितस्थळी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती तेथे नेण्यात आले.
 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी म्हणजेच शासकीय गोदामात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या  निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्थेसह, वैद्यकीय तपासणी करुन उपचार सेवा देण्यात आली. त्याच प्रमाणे गुरांनाही पशुवैद्यकीय सेवा देण्यात आली.
या संपूर्ण सरावाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून नियंत्रण करण्यात आले. त्यासाठी  सागरी सुरक्षा दलाच्या बोटींचा वापर करण्यात आला. तसेच नागरिकांना आणि स्वयंसेवकाना लाईफ जॅकेट्स देण्यात आले. तसेच संपर्कासाठी  अत्याधुनिक संपर्क साधनांचा वापर करण्यात आला. आपत्ती काळात खंडीत होणाऱ्या वीज पुरवठा व  दूरसंचार सेवा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आल्या होत्या.  तसेच रक्त संकलन केंद्रही स्थापन करण्यात आले. तेथे एक रक्तदान शिबिरही घेण्यात आले.
यावेळी  मुरूड तहसीलदार उमेश पाटील बोर्ली सरपंच नौशाद दळवी,मांडला सरपंच सुचिता पालवणकर, तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि बोर्ली-मांडला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 त्सुनामी या नैसर्गिक आपत्तीचा अथवा अन्य कोणत्याही स्वरुपाच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी कशी खबरदारी घ्यावी, यासाठी हे सराव सत्र आयोजित करण्यात आले असे तहसिलदार व सत्र प्रमुख उमेश पाटील यांनी सांगितले.
या सराव सत्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, खारभूमी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, परिवहन विभाग, विज वितरण कंपनी, सागरी सुरक्षा विभाग, वन विभाग, निवारा केंद्र पथक,  रक्तपेढी पथक,  जिल्हा माहिती कार्यालय,  पोलीस पथक अशा विविध पथकांनी सहभाग घेतला.  तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी,ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक