गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक : चोख नियोजनातून सण गुण्यागोविंदाने साजरे करु - पालकमंत्री चव्हाण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- गणेशोत्सव व सर्व धर्मीयांचे सण गुण्यागोविंदाने साजरे करण्यासाठी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे चोख नियोजन  आवश्यक आहे. त्यासाठी आपण सारे मिळून हातात हात घालून कामकरुन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अशा सौहार्दपूर्ण वातावरणातूनच आपण रायगड जिल्ह्याला प्रगतीकडे नेण्यासाठी कटीबद्ध होवू या, असे मार्गदर्शन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज खोपोली येथे केले.
         खोपोली ता. खालापूर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज गणेशोत्सव 2018- पूर्व तयारी आढावा व जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ना. चव्हाण यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले. यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडको अध्यक्ष तथा आ.प्रशांत ठाकुर, आ.सुरेश लाड, खोपोली नगराध्यक्ष सुमन औसरमल, प्रभारी  जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर,अप्पर अधिक्षक सचिन गुंजाळ, कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी  आदींसह जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जि. प. अध्यक्ष आदितीताई तटकरे यांनी सुचना मांडल्या की, जिल्ह्यात  महामार्गावर कामे सुरू आहेत. त्याठिकाणी काम सुरू असल्याचे व दिशादर्शक फलक लावण्यात यावे, वाहतूक नियमनासाठी बॅरिकेट्स व मदतीसाठी मोबाइल व्हॅन उपलब्ध कराव्यात. अशा सुचना त्यांनी संबंधित विभागांना केल्या. तसेच उत्सव काळात ग्रामीण भागात आरोग्य राखण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येतील व जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. आ. सुरेश लाड म्हणाले की, मोठ्या प्रमाणात वाहतुकोंडी रोखण्यासाठी दोन दिवस वाहनांसाठी टोल फ्री करा. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनीही प्रशासनाला मौलिक सुचना केल्या.
     यावेळी झालेल्या चर्चेत  जिल्हा शांतता समितीचे सदस्य उल्हासराव देशमुख,खोपोली पालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्यासह विविध सदस्यांनी आपले म्हणणे मांडले.
        सर्व सदस्यांचे म्हणणे व सुचना ना. चव्हाण यांनी शांतपणे समजावून घेतल्या. त्यानंतर ना. चव्हाण म्हणाले की,  सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील मुख्य रस्ते,आरोग्य यंत्रणा, विज,पाणी आदी सेवा अविरतपणे उपलब्ध झाल्या पाहिजे याकडे  जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्या, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले.   ते म्हणाले की,  जिल्हा प्रशासन सेवा सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करतीलच मात्र त्यांना लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थानी सक्रीय सहभाग द्यावा व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी गणेश मंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक