आयुक्तांचा युवा मतदारांशी संवाद : मतदान लोकशाही व्यवस्थेतील सर्वाधिक प्रभावी अस्त्र- आयुक्त डॉ.जगदिश पाटील



अलिबाग, जि.रायगड दि.26,(जिमाका) – लोकशाही व्यवस्थेत ‘आपल सरकार’ निवडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाच्या हक्काद्वारे देण्यात आला आहे. मतदानाचा हक्क हे लोकशाही व्यवस्थेतील सर्वात प्रभावी अस्त्र असून, आपला देश घडविण्यासाठी आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन कोकण विभागाचे आयुकत डॉ.जगदिश पाटील यांनी आज येथे केले.
येथील जे.एस.एम. महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेत डॉ.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी नवमतदारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपायुक्त सिध्दराम सालीभट, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, प्राचार्य निळंकठ शेरे, तहसिलदार सचिन शेजाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले. त्यात नेहा कुन्नुमल, श्वेता बापट, अनुजा झाडेकर, सुयोग करंबत, तसेच दिव्यांग मतदार चिन्मय सुनिल फडके या मतदारांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मतदानाच महत्व आणि मतदार नोंदणीच महत्व सांगितलं. मतदानाच कर्तव्य बजावून आपण आपला देश घडवू शकतो. प्रत्येकाने  आवर्जून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याच महाविद्यालयातील निवडणूक ॲम्बेसेडरना मतदार नोंदणीचे नमुना 6 चे अर्जही आयुक्त डॉ.पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.पाटील म्हणाले की, मतदार होणे ही आत्मविश्वास निर्माण करणारी बाब आहे. चांगला देश घडवायचा असेल, तर चांगला नागरिक होणं आवश्यक आहे. जबाबदार नागरीक हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाही प्रगल्भ करुन आपला देश प्रगतीपथावर नेण्याची आपल्या साऱ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व तरुणांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करावी व आपला मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले.
प्रास्ताविक निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी तर आभार प्रदर्शन प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी केले. सुत्रसंचालन तहसिलदार सचिन शेजाळ यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक