सैन्य भरती मेळाव्याचे योग्य नियोजन करावे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.24- सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांचेमार्फत कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे दि.4 ते 13 आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या भरतीसाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने येणार आहेत. या मेळाव्यात ५ ते ६ हजार युवक सहभागी होण्याची शक्यता आहे. सर्व भरती प्रकिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व संबंधीत विभागांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी   डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, पनवेलच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कर्नल मनु, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव, गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे, पोलीस इन्स्पेक्टर अशोक म. नाईक, एसआरपी ग्रुप 11 चे भास्कर महाडीक, सिडकोचे विरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, भरतीसाठी दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे सर्व भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने पार करण्यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा सैनिक विभाग व जिल्हा प्रशासनातील विविध विभाग यांनी या कालावधीत कोणत्या विभागाने काय कामे करावयाची आहेत याचा आराखडा तयार करावा. या भरती प्रक्रियेत पोलीस विभागाची जबाबदारी महत्वाची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वीज वितरण कंपनी, भारत संचार निगम यांनी वीज व इंटरनेट सुविधा उत्तमरित्या सुरु ठेवावी. भरती प्रक्रियेसाठी अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यास तसेही नियोजन करावे.  बैठकी आधी भरती संदर्भात कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल (रायगड) येथे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आली.

भरती प्रक्रिया
दि. 04 आक्टोंबर-मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
05 ते 07 आक्टोंबर - नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
08 आक्टोंबर-वैद्यकिय तपासणी.
09 व 10 आक्टोंबर- नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
11 आक्टोंबर -ठाणे जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
12 आक्टोबर- पालघर व रायगड जिल्हयातील युवकांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे.
13 ते 15 आक्टोंबर- पात्र युवकांची वैद्यकिय तपासणी.
16 आक्टोंबर आरक्षित.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक