मुंबई गोवा महामार्ग दुरुस्ती : ना. चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा; गणेश आगमना पुर्वी रस्ते सुसज्ज करण्याचे निर्देश



अलिबाग, जि. रायगड, दि. (जिमाका)-  गणेश चतुर्थीला चाकरमान्यांना कोकणाकडे जाणे सुकर व्हावे यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सा.उ. वगळून)  ना. चंद्रकांत पाटील यांनी आज पनवेल येथे दिले.
            यासंदर्भात ना. चंद्रकांत पाटील यांनी आज सायन- पनवेल ते पळस्पे या दरम्यान महामार्गाची पाहणी केली. आणि त्यानंतर पनवेल शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पनवेल महापौर डॉ.कविता चौतमल,  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे  आदी अधिकारी उपस्थित होते.
ना. पाटील यांनी गेल्या आठवड्यात (शुक्रवार दि.31 ऑगस्ट रोजी) महामार्ग पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या आत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा त्यांनी आजच्या बैठकीत घेतला. गणेश चतुर्थीसाठी भाविक कोकणाकडे निघण्याआधी खड्डे भरुन रस्ता रहदारीस योग्य करुन देण्याबाबत ना. पाटील यांनी सुचना केल्या. रस्त्याच्या भूसंपादन कामातील शेष कामांचाही आढावा त्यांनी घेतला. आता संपूर्ण महामार्गाचे काम गतिने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान ना. पाटील यांनी पळस्पे फाट्यापर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते कोकण भवन येथे सुनावणी कामकाजासाठी रवाना झाले.
महामार्ग टप्पा पनवेल ते इंदापुर :-  या दरम्यान 84.6 किमी रस्त्याच्या कामात  6 मोठे पूल असून 25 लहान पूल आहेत, एक फ्लाय ओव्हर असून 3 रेल्वे पूल आहेत. 15 सब वे (पादचाऱ्यांसाठी), 12 सब वे ( वाहनांसाठी) असून अन्य 12 मोठ्या तर 94 लहान रस्ते छेदक आहेत. या दरम्यान एकूण 52 बस थांबे असून  4 ठिकाणी ट्रक थांबे आहेत.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक