जिल्हा नियोजन समिती बैठक मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करा- पालकमंत्री ना. चव्हाण


अलिबाग,जि. रायगड, दि.12,(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत  कामे पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.
जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील,आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकुर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशिल पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी  भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच  सर्व सदस्य व सर्व विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
 बैठकीच्या प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, आंबेनळी घाट अपघातातील मृत, केरळ पुरग्रस्त आदींबाबत दुखवट्याचा ठराव मांडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या निवडीबद्दल विधानसभा सदस्य आ. प्रशांत ठाकुर यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल, डॉ. भरत वाटवानी यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील अन्य मान्यवरांच्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला एकमताने अनुमोदन मिळाले.
यावेळी माहिती देण्यात आली की, सन 2018-19 साठी जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत 189 कोटी 17 लक्ष रुपये, विशेष घटक योजनेअंतर्गत 24 कोटी 94 लक्ष रुपये व आदिवासी उपयोजनेसाठी 55 कोटी 95 लक्ष  असा एकूण 270 कोटी रुपयांचा आराखडा आहे. यावेळी आढावा घेतांना ना. चव्हाण म्हणाले की, यातून निधी खर्च करुन जिल्ह्यातील विकास कामे करावयाची आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक कालावधी लक्षात घेता खूप कमी कालावधी उपलब्ध होईल, त्यादृष्टीने नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत, जिल्ह्यातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात तसेच नव्याने निर्माण होत असलेल्या नागरी वसाहतींमधील सांडपाण्याच्या प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची समिती पाहणी करुन अभ्यास करतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकमताने काम करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री ना. चव्हाण यांनी उपस्थित सदस्यांना केले. तसेच ज्या यंत्रणांचा निधी खर्च न होता शासनास समर्पित होईल अशा यंत्रणा प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही ना. चव्हाण यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक