‘दिशा’ समिती बैठक लाभार्थ्यांपर्यंत वेळेत लाभ पोहोचविण्याची यंत्रणेने दक्षता घ्यावी- केंद्रीय मंत्री ना. गिते


अलिबाग,जि. रायगड, दि.15,(जिमाका)- केंद्र शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या योजनांमधून होणारी लोकहिताची कामे वेळेत पूर्ण करुन लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी आज येथे दिशा संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज दिशा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ना. अनंत गिते हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच किशोर जैन, जि. प विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे सर्व सदस्य व सर्व विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
 बैठकीच्या प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, आंबेनळी घाट अपघातातील मृत, केरळ पुरग्रस्त आदींबाबत दुखवट्याचा ठराव मांडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील अन्य मान्यवरांच्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला एकमताने अनुमोदन मिळाले.

यावेळी ना. गिते यांनी केंद्रीय योजनांचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना,  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,  पंडीत दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना,  शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना इ. विविध योजनांचा आढावा घेतला. या योजनाअंतर्गत  प्रधानमंत्री शहरी आवास योजनेची अंमलबजावणी करता यावी यासाठी अलिबाग शहरात जागा उपलब्ध करण्याबाबत, पाणी पुरवठा योजना व जलस्त्रोतांशी संबंधित अर्धवट प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले. तसेच लोकसहभागातून साठवण बंधाऱ्यातील गाळ काढून आत्ताच जलसाठवण क्षमता निर्माण करा, असे निर्देशही ना. गिते यांनी दिले.  तसेच शालेय पोषण आहार योजनेतून मुलांना दिले जाणारा आहार हा दर्जेदार असावा, याची चाचणी अन्न व औषध प्रशासन विभागाने द्यावा, असे निर्देश ना . गिते यांनी दिले.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड