पत्रपरिषद : नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड, दि.25,(जिमाका)- आगामी निवडणूकांसाठी 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या  व्यक्तिंची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या 31 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, उद्योग क्षेत्रात आदी ठिकाणी तसेच घरोघरी जाऊन निवडणूक कर्मचारी नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म क्रमांक 6 भरुन घेत आहेत. तरी सर्व नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आपल्या नजिकच्या मतदार नोंदणी कर्मचाऱ्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
 आगामी निवडणूकांसंदर्भात सुरु असलेल्या मतदार नोंदणी अभियान तसेच मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व मतदान यंत्र,VVPAT मशिन यांची प्रथमस्तरीय चाचणी याबाबत माध्यमांना माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी  (निवडणूक) वैशाली माने उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, जिल्ह्यातमतदार पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून त्याअंतर्गत नवीन नाव नोंदणी, 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत नव मतदार नाव नोंदणी, तसेच नावे वगळणे, दुबार नावे छाननी व वगळणे अशी कामे सुरु आहेत.  नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आदिवासी पाड्यांवर जाऊन नाव नोंदणी करणे, प्रत्येक महाविद्यालयातील नव मतदारांची नाव नोंदणी करणे,  त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एक अध्यापक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.  जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या आस्थापनांकडून माहिती मागवून त्यांच्या कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी, काम सोडून गेलेल्यांची पत्ता बदललेल्यांची नावे वगळणे, जिल्ह्यातील सुमारे 3 हजार गृहनिर्माण संस्थांच्या संचालकांमार्फत त्या त्या संस्थेतील मतदारांची नोंदणी, स्थलांतरीतांची नावे वगळणे, नावात बदल आदी कामे होत आहेत.  नवीन मतदार नोंदणीसाठी या अभियानात आतापावेतो 36 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अजून 31 तारखेपर्यंत ही मोहिम सुरु असून  मतदारांनी आपले अर्ज तात्काळ द्यावे, असे आवाहन यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी केले.  या सोबतच जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांचीही नाव नोंदणी यात होत आहे.  प्रत्येक मतदान केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आहेत. यात दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांची मदत घेतली जात आहे. मतदान केंद्र अधिकारी व दिव्यांग संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त मतदान केंद्र भेटी आयोजित करण्यात येत आहेत.
नवीन मतदार नोंदणीसाठी हा अंतिम आठवडा असून आपले वय व रहिवासाचा पुरावा जोडून आपण आपल्या नजिकच्या मतदान केंद्रावर आपले नाव नोंदवू शकता, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूकीसाठी 2693 मतदान केंद्रांकरीता मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. त्यात कंट्रोलिंग युनिट 3326 व मतदान युनिट 5721 इतके आहेत. याशिवाय VVPAT यंत्रे 3326 दाखल झाली आहेत.  या यंत्रांची प्रथम स्तरीय चाचणी सुरु असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक