शासकीय विभागांना पारदर्शक खरेदीसाठी ‘जेम’ पोर्टल उपयुक्त निवासी उप जिल्हाधिकारी पाणबुडे यांचे अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रतिपादन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3- शासनाला लागणाऱ्या विविध वस्तू, सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने ‘जेम’ GeM (Government e-Marketplace) पोर्टल विकसित केले असून या द्वारे अधिकाधिक पारदर्शक  खरेदी व्यवहार करुन शासनासाठी उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवा वाजवी दरात घेऊन आर्थिक बचतही होऊ शकते. त्यामुळे ‘जेम’ पोर्टल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर खरेदी व्यवहारांसाठी करावा,असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे केले.
‘जेम ‘ पोर्टलद्वारे करावयाच्या खरेदीची तसेच ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाणबुडे बोलत होते. यावेळी  उद्योग विभागाच्या उपसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, जेम पोर्टलचे नवी दिल्ली येथील अधिकारी सुरज शर्मा, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती एम.एन. देवराज तसेच सर्व विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, शासनाच्या सर्व विभाग,शासकीय उपक्रम,महामंडळे व त्या अंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी ‘Gem पोर्टल’ विकसित केलेले आहे. राज्यशासनाने शासन निर्णय निर्गमित करुन या पोर्टलची कार्यपद्धती वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी राज्यामध्ये दिनांक 24 ऑगस्ट पासून बंधनकारक केली आहे. यावेळी उपस्थितांना श्रीमती शिरसाठ आणि श्री.शर्मा यांनी  या प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.
Gem पोर्टल नोंदणीचे फायदे- Gem पोर्टलवर नोंदणी केल्याने उत्पादक, पुरवठादारांना आपले उत्पादनाचा पुरवठा राज्यस्तरावर किंबहुना देशस्तरावर करणे सोपे होणार आहे. या प्रक्रीयेचा अवलंब केल्याने पुरवठादारांना मालाचा पुरवठा केल्यानंतर मालाची रास्त किंमत विहीत वेळेत प्राप्त होवून व्यवहार पारदर्शकपणे होणार आहे. सदरच्या प्रक्रियेमुळे पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदीदार उपलब्ध होवून मक्तेदारी प्रथा पुर्णपणे नष्ट् होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक