पनवेल येथे सैन्य भरती मेळाव्यास सुरुवात : पालकमंत्री ना. चव्हाण यांची भल्या पहाटे भेट व पाहणी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ग्राउंड, पनवेल येथे  आयोजित सैन्य भरती मेळाव्यास आज पहाटे अडीच वाजेपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी मुंबई शहर भागातील तब्बल अडीच हजारांहून अधिक युवकांनी मेळाव्यास उपस्थिती दिली. आज पहिल्याच दिवशी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी भल्या पहाटे चार वा. भरती स्थळी जाऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह सदर भरती प्रक्रिया राबविणारे  सैन्य भरती केंद्र पुणे चे मेजर जनरल सतिष एन वासाडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.4  ते  13  आक्टोंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारासाठी हा मेळावा होणार आहे. लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यावस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. आज पहाटेपासून या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. या भरतीचे विविध टप्पे असून या विविध टप्प्यांवरील चाचण्या करता याव्यात यासाठी पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे  सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाने सैन्य दलास उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात नोंदणी, बायोमेट्रीक नोंदणी, मैदानी चाचणीसाठी 400 मीटर्सचा धावण्याची मार्गिका,  प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, अन्य शारीरिक चाचण्यांसाठीची व्यवस्था, वैद्यकीय चाचण्या आदींची सुविधा करण्यात आली आहे. याठिकाणी लष्करी दलाचे सुमारे 150 अधिकारी व जवान ही प्रक्रिया पार पाडत आहेत.  या भरती स्थळी संपूर्ण क्षेत्र हे सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात असून संपूर्ण भरती प्रक्रियेचे ध्वनिचित्रमुद्रण केले जात आहे, अशी माहिती यावेळी मेजर जनरल सतिष वासाडे यांनी पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.
संपूर्ण पारदर्शक भरती प्रक्रिया
सदरची भरती प्रक्रिया ही पूर्णतः पारदर्शक असून  प्रत्येक उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. त्याला ऑनलाईनच प्रवेशपत्र मिळालेले आहे. प्रवेशपत्र हे बारकोडसहित असल्याने ते ज्याचे आहे त्याच उमेदवाराला प्रवेश मिळतो.  भरतीसाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रीक ओळख पडताळणी  प्रत्येक टप्प्यावर होते.  या भरतीचे तीन टप्पे आहेत.  शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, आणि लेखी चाचणी. या सर्व टप्प्यांवर पूर्णतः पारदर्शकता पाळली जाते. प्रत्येक टप्प्यावर संगणकीकृत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक उमेदवार जो सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करेल त्याची निवड हमखास होईल. त्यामुळे उमेदवारांनी संपुर्ण प्रक्रियेत निष्ठेने आणि शिस्तीने सहभागी व्हावे, असे मेजर जनरल सतिष वासाडे यांनी  आवाहन केले आहे. या भरतीबाबत कुणाही मध्यस्थ दलालांकडे उमेदवारांनी जाऊ नये, त्यांच्या अमिषाला बळी पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चार वा. कर्नाळा स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे भेट देऊन भरती प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी सहभागी युवकांशी संवाद साधत त्यांना सुयश चिंतीले. यावेळी ना. चव्हाण यांच्या समवेत सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, कर्नल मनू आदी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही उपस्थित युवकांशी संवाद साधला.  पालकमंत्री चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी झेंडी उंचावून  उमेदवारांची धावण्याच्या चाचणीचा प्रारंभ केला.
जिल्हाप्रशासनाने दिलेल्या सुविधांचे कौतूक
या भरतीप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मेजर जनरल सतिष वासाडे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, अत्यंत उत्तम सुविधा व सुरक्षा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात पाणी, स्वच्छता, वीज, सुरक्षा व्यवस्था आदींची उत्तम व्यवस्था दिल्याने ही भरती प्रक्रिया उत्तम तऱ्हेने पार पाडता येईल असा विश्वास मेजर जनरल वासाडे यांनी व्यक्त केला.
भरती प्रक्रिया वेळापत्रक
दि. 04 आक्टोंबर-मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
05 ते 07 आक्टोंबर - नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
08 आक्टोंबर-वैद्यकिय तपासणी.
09 व 10 आक्टोंबर- नाशिक जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
11 आक्टोंबर -ठाणे जिल्हयातील युवकांकरिता फक्त. स्क्रिनिंग.
12 आक्टोबर- पालघर व रायगड जिल्हयातील युवकांकरिता भरती प्रक्रिया होणार आहे.
13 ते 15 आक्टोंबर- पात्र युवकांची वैद्यकिय तपासणी.
16 आक्टोंबर आरक्षित.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक