चारा उत्पादन, बांधणी व साठवणुकीवर भर द्या- प्रधानसचिव अनुपकुमार : जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकीत



            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याकरीता जिल्ह्यात चारा उत्पादन, तसेच उपलब्ध चाऱ्याची उत्तम बांधणी व साठवणूकीचे डेपो तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची क्षमता बांधणी  करुन भर द्या, असे निर्देश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांनी  आज येथे दिले. यावेळी जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल त्यांना अनुपकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय  विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय  विभागाचा आढावा एका बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव विजय चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार तसेच जिल्ह्यातील सर्व  पशुचिकित्सक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पशुसंवर्धन विभागातर्फे माहिती देण्यात आली की,  कुक्कुटपालन व्यवसायात जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून 6758 कुक्कुटपालन युनिट्स मधून तब्बल 80 हजार जणांना रोजगार उपलब्ध होत आहे. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात गाव तिथं 500 लिटर दुध उत्पादन वाढ हे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून जिल्ह्यात सन 2022 पर्यंत दुधाचे 4 लाख लिटर उत्पन्न वाढ होईल, असे सांगण्यात आले. तर कुक्कुट पालनाचे 9000 युनिट्स होतील. जिल्ह्यातील वैरण विकासाला चालना देण्यासाठी  मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन या सारख्या उपक्रमांना चालना देऊन  वैरण उत्पादन वाढविले जात आहे.
अनुपकुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे शेतीसोबत जोडधंद्यातून उत्पादन जसे दुध, कुक्कूटपालन, शेळी पालन हे वाढवितांना शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करुन उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करुन त्यांना थेट बाजार पेठेशी जोडण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे साखळी रिटेल विक्रेता संस्थांशी सहयोग करुन त्यांनी उत्पादन केलेल्या मांस व अंड्यांना थेट बाजारपेठ मिळून मध्यस्थांच्या शिरकावाला आळा घालावा, असे निर्देशही अनुपकुमार यांनी दिले.  
जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे पशुवैद्यकीय अधिकारी, पशु विस्तार अधिकारी यांना अनुपकुमार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक