राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा समारोपः पुणे विभागाचे वर्चस्वः उत्तम खेळाडू सर्व क्षेत्रात यशस्वी होतो- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)- स्पर्धेतील यश अपयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्विकारतो. त्यामुळे त्याला जीवनात येणारे यश अपयश हाताळण्याची सवय होते, म्हणून खेळाडू हा निश्चितपणे जीवनातील सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि.2) राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभ प्रसंगी केले.  या स्पर्धेत पुणे विभागाने 14 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले संघाने प्रथम क्रमांक तर 19 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतिय क्रमांक संपादन करुन वर्चस्व राखले.
जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे आयोजित या समारंभप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पूरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तर स्पर्धेत राज्याच्या विविध आठ विभागामधून 576 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील सर्व सहा गटातील प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांक संपादन केलेल्या संघातील खेळाडूंना चषक व पदके जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत पुणे विभागाच्या 14 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले संघाने प्रथम क्रमांक पटकवून स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतिय क्रमांक संपादन करुन स्पर्धेत वर्चस्व राखले. त्यानंतर नाशिक विभागाच्या 14 वर्षाखालील मुले संघाने प्रथम, 17 वर्षाखालील मुली व 19 वर्षाखालील मुले संघाने तृतिय क्रमांक संपादन करुन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान ठेवले. यजमान मुंबई विभागास 14 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतिय क्रमांक मिळाला.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले की खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याने निवड चाचणीमध्ये उत्तम कामगिरी करावी व निवडलेल्या संघांनी राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करुन राज्यास जास्तीत जास्त पदके जिंकावीत अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले. तसेच राज्यस्तर शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे दर्जेदार आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे कौतूक केले.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले तर क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचे निकालः-
14 वर्षाखालील मुले-
अंतिम सामना- नाशिक वि. वि. लातुर 21-35, 35-26, 35-24
तृतिय क्रमांकासाठी सामना – नागपूर वि. वि. पुणे 35-28, 35-29
14 वर्षाखालील मुली-
अंतिम सामना- पुणे वि. वि. लातूर 35-20, 35-15
तृतिय क्रमांकासाठी सामना – मुंबई वि. वि. नाशिक 35-31, 30-35, 35-33
17 वर्षाखालील मुले-
अंतिम सामना- अमरावती वि. वि. पुणे 36-34, 35-33
तृतिय क्रमांकासाठी सामना – लातूर वि. वि. नाशिक 25-35, 35-32, 35-21
17 वर्षाखालील मुली-
अंतिम सामना- नागपूर वि. वि. औरंगाबाद 35-28, 31-35, 36-34
तृतिय क्रमांकासाठी सामना – नाशिक वि. वि. पुणे 35-37, 35-27, 35-33
19 वर्षाखालील मुले-
अंतिम सामना- पुणे वि. वि. कोल्हापूर 35-31, 35-29
तृतिय क्रमांकासाठी सामना – नाशिक वि. वि. मुंबई 35-33, 35-19
19 वर्षाखालील मुली-
अंतिम सामना- कोल्हापूर वि. वि. औरंगाबाद 35-28, 35-27
तृतिय क्रमांकासाठी सामना – पुणे वि. वि. नाशिक 35-21, 35-17
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक