राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनः नाचणी, वरी चे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


            अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- नाचणी वरी यासारख्या पोषणमूल्य असणाऱ्या तृणधान्याचे आहारातील महत्त्व खूप आहे. आहारात या धान्यांचा समावेश व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात नाचणी, वरी सारख्या तृणधान्य पिकांखालील क्षेत्र वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, आहारतज्ज्ञ  डॉ. शंकर फुलवाले, उपशिक्षणाधिकारी सुनिल गवळी  तसेच कृषि विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाने सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष घोषित केले आहे. ज्वारी, बाजरी, रागी व अन्य लघु अन्नधान्ये या पिकांना त्यांचे आहारातील महत्त्व लक्षात घेता पौष्टीक अन्नधान्य कार्यक्रमात रागी (नाचणी) या पिकासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. त्याअनुषंगाने यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. शंकर फुलवाले यांनी आहारातील तृणधान्यांचे महत्त्व सांगितले. यावेळी डॉ. फुलवाले यांनी आहारात नागली, वरी सारख्या लघुधान्यांचा समावेश केल्यास अन्नपचन सुलभ होऊन पचन व्यवस्था सक्षम होते. शरिराला उर्जा मिळते. परिणामी उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे या तृणधान्यांचा आहारात समावेश करावा, असे सांगितले. तर उपशिक्षणाधिकारी गवळी यांनी तृणधान्याचा आहारात समावेश करण्यासंदर्भात जनजागृती करुन हे आहारविषयक जनआंदोलन प्रबळ करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषि उपसंचालक तानाजी पावडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक