जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सभा रुग्णांच्या उपचार-चाचणी सुविधांना प्राधान्य द्या-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


            अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्णांना द्यावयाच्या उपचार-चाचणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिले.
            जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती तसेच एयआयव्ही-क्षयरोग रुग्ण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.  याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभय यावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुरेश देवकर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, डॉ.अनिल फुटाणे, पी.एस.तांगडे, अनंत देशमुख, रविंद्र कदम, वैष्णवी पाटील, अजित पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सन 2017-18 मध्ये 1 लाख 1 हजार 475 जणांची एचआयव्ही चाचणी झाली.  त्यात 461 एचआयव्ही बाधीत रुग्ण आढळले.  त्यापैकी 423 जणांनी एआरटी उपचार सुरु केले आहेत.  यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 63 हजार 845 रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी 226 जण एचआयव्ही बाधीत आढळले असून 207 जणांवर एआरटी उपचार केंद्रात उपचार सुरु आहे.  सन 2017-18 मध्ये 51 हजार 692 गरोदर मातांची चाचणी झाली त्यातील 26 जणी एचआयव्ही बाधीत होत्या त्या सर्व जणींवर एआरटी उपचार सुरु आहेत.  यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 29 हजार 492 गरोदर मातांची तपासणी झाली त्यातील 9 जणी एचआयव्ही बाधीत आढळल्या असून त्यासर्व जणींवर एआरटी उपचार सुरु आहेत.
एचआयव्ही आणि क्षयरोग या संयुक्त तपासणीत एप्रिल 17 ते मार्च 18 या वर्षभरात 48 हजार 269 रुग्णांची क्षयरोग तपासणी झाली त्यात 368 एचआयव्ही बाधीत होते.  त्यात 22 एचआयव्ही बाधीत रुग्णांना क्षयसंसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.  त्यातील 21 जणांवर डॉटस उपचार सुरु आहेत.  त्याचप्रमाणे क्षयसंसर्गित 3501 रुग्णांपैकी 3423 जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली.  त्यापैकी 7 जणांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.  असे जिल्ह्यात 29 जण हे क्षय व एचआयव्ही बाधीत आहेत. 
या संयुक्त तपासणीत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 27 हजार 712 रुग्णांची क्षय चाचणी झाली त्यात एचआयव्ही बाधीत 158 रुग्ण होते.  त्यापैकी 8 जणांना क्षय संसर्ग निदान झाले.  तर क्षय संसर्ग असलेल्या 1722 जणांची एचआयव्ही तपासणी केली असता एक रुग्ण एचआयव्ही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले.
एचआयव्ही बाधीतांना शासनातर्फे विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ दिला जातो.  त्याचा लाभ जिल्ह्यातील 2355 रुग्णांना दिला जात आहे.  जिल्हा रुग्णालयात जिल्हा विकास निधीतून सीडी 4 काऊंट माशिन मध्ये उपलब्ध झाले आहे.  त्यामुळे अलिबाग येथेचे सीडी 4 काऊंट चाचण्या होणे शक्य होणार आहे.  तसेच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आयसीटीसी केंद्राकरिता विविध उपकरणे मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक