रायगड जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटनः तरुणांनो,शेतकरी व्हा आणि आदर्श निर्माण करा- पालकमंत्री ना. चव्हाण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:- शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून शेतकरी व्हा आणि लोकांसमोर आदर्श निर्माण करा, असे आवाहन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज खांदेश्वर ता. पनवेल येथे केले.
रायगड जिल्ह्याचा कृषि महोत्सव दिनांक 28 ते 31 डिसेंबर या कालावधी खांदेश्वर रेल्वे स्टेशन, सेक्टर क्र. 29, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन आज पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
या उद्घाटन सोहळ्यास सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका हेमलता म्हात्रे, संतोषी तुपे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पांडुरंग शेळके आदी मान्यवर तसेच शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी ना.चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्याकडून उत्पादनाविषयी माहिती घेतली. आपल्या भाषणात ते म्हणाले की, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. हा महोत्सव सामान्य शेतकऱ्यांना व्यासपीठ व बाजारपेठ मिळवून देणारा उपक्रम आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.खाडी व समुद्राच्या उधाणामुळे पीक धोक्यात असते, त्यासाठी सक्षम पर्याय देण्याची गरज आहे. जिल्ह्यात कडधान्य पीकही मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. शेतीसोबत मत्स्य शेतीस प्राधान्य देणे आवश्यक असून त्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ देण्यात येत आहे. त्यालाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तरुणवर्गाने स्थलांतरित न होता शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसाची साठवणूक नीट व्हावी यासाठी साडेचार हजार पेक्षा जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम करण्यात आले. जिल्ह्यात धरण, तलाव आदी जलाशयातुन लोकसहभातून साडेतीन लाखपेक्षा मेट्रिक गाळ काढण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.  प्रास्ताविक कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी केले, त्यांनी या महोत्सवासंदर्भात माहिती विषद केली. या महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गटांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  
या महोस्तवाचा समारोप 31 डिसेंबर रोजी होणार असून या महोत्सवात कृषि उत्पादनांचे प्रदर्शन व  विक्री होणार आहे, त्याचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक