अलिबाग येथे आजपासून जिल्हा ग्रंथोत्सव



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018 हा उपक्रम दिनांक 15 व 16 डिसेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त माहितीनुसार, शनिवार दि.15 रोजी सकाळी साडेदहा वा. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथपूजन सोहळा होईल. यावेळी सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांची उपस्थिती राहील.  उद्घाटन सोहळा हा केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून  राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण  राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. या सोहळ्यास  जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, लोकसभा सदस्य  खा.श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आ.जयंत पाटील,आ.निरंजन डावखरे,आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे तसेच विधानसभा सदस्य आ.श्री.सुभाष पाटील, अलिबाग,आ.सुरेश लाड,कर्जत,आ.भरत गोगावले महाड,आ. धैर्यशील पाटील, पेण,आ.मनोहर भोईर, उरण, आ.अवधूत तटकरे, रोहा या मान्यवरांची उपस्थिती राहणार असून  या सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठ, पुणे येथील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार,  ग्रंथालय संचालक, मुंबई सु.हि.राठोड, सहायक ग्रंथालय संचालक, मुंबई विभाग श्रीम. शालिनी इंगोले यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
परिसंवाद व कविसंमेलन
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी 12 वाजता ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी  अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे हे राहतील. तर या परिसंवादात जेष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, अलिबाग, प्रविण कुळकर्णी, म्हसळा, मिलिंद आष्टिवकर, रोहा, कांतीलाल कडू,पनवेल, संतोष पवार, माथेरान आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करतील.
कवि संमेलन
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जिल्हयातील प्रसिध्द कवींच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण  दुपारी तीन वाजता कवि संमेलनात होईल. या कविसंमेलनाचे अध्यक्ष सहयाद्री मंडळ अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे हे राहणार असून या कविसंमेलनात रायगड जिल्ह्यातील मान्यवर कवि आपल्या कविता सादर करतील. या संमेलनाचे सुत्रसंचलन श्रीमती जिवीता पाटील या करतील. त्यानंतर दुपारी साडेचार वा. ‘माझ्या जडणघडणीतील ग्रंथांचे महत्व’ या विषयावर  साहित्यिकांचा परिसंवाद होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग येथील ज्येष्ठ साहित्यिक विलास नाईक हे असतील. तर त्यात उरण येथील एल. बी. पाटील, पनवेल येथील प्रा. चंद्रकांत मढवी, गोरेगाव (माणगाव) येथील डॉ. नंदकुमार मराठे, अलिबाग येथील श्रीमती पुजा वैशंपायन, अलिबाग हे साहित्यिक आपले विचार मांडतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन रमेश धनावडे हे करतील.
‘गुण गाईन आवडी’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
महाराष्ट्राचे थोर गीतकार ग. दि. माडगुळकर व  साहित्यिक पु. ल. देशपांडे  यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष  सांस्कृतिक कार्यक्रम ‘गुण गाईन आवडी’ सायं.सात वा. आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विक्रांत वार्डे व श्रीमती श्रृती बोंद्रे हे व स्थानिक कलावंत सादर करतील.
‘माझे वाचन आणि मीः’परिसंवाद
दुसऱ्या दिवशी (रविवार दि.16) सकाळी 11 वाजता ‘माझे वाचन आणि मी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष  जेष्ठ साहित्यिक, तथा कोकण साहित्य मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर हे असतील. या परिसंवादात  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागच्या कार्याध्यक्ष श्रीमती शैलाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक व माजी आकाशवाणी केंद्र प्रमुख किशोर सोमण, हे मान्यवर आपले विचार मांडतील.
विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्वस्पर्धा
शालेय  विद्यार्थ्यांमध्ये  वाचनाचे संस्कार रुजावेत म्हणून  राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून  इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथवाचनातून मला भावेलेले गांधीजी’  या गांधीजींच्या जीवनावरील ग्रंथ वाचन व त्या अनुष्ंगाने  वक्तृत्व स्पर्धा  शिक्षण विभागाच्या  वतीने आयोजित  केली जाणार आहे. या स्पर्धेत तालुका स्तरावर एक  विद्यार्थी  निवडला जाणार असून अशा विद्यार्थांची  जिल्हास्तरावर ग्रंथोत्सवात वत्कृत्व स्पर्धा होऊन त्यातून विजेते निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा रविवारी दुपारी साडेबारा वा. आयोजित करण्यात आली आहे.
व्याख्यान व परिसंवाद
दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात दुपारी तीन वा. ‘गांधी समजून घेतांना’ या विषयावर  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे, यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी चार वा. ‘डिजीटल वाचन’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी  मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. श्रीमती आरती विजय सूर्यवंशी, या असतील तर या विषयावर जळगाव येथील डिजीटल मिडीया तज्ज्ञ शेखर पाटील, ठाणे येथील अमृत देशमुख हे तज्ज्ञ वक्ते आपले विचार मांडतील.
समारोप
वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व समारोप सोहळा रविवारी सायं.6 वा. होईल या सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी  हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. फिरोज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांची उपस्थिती राहिल.
दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सव सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व वाचक व वाचनप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे  अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी तसेच सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग बा. वळवी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक