जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन : पुस्तकेच असतात खरे मित्र, गुरु आणि मार्गदर्शक- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- वाचनामुळे पुस्तकांची आपल्याला आवड निर्माण होते आणि हेच पुस्तके आपले खरे मित्र, गुरु आणि मार्गदर्शक बनतात, जीवनाच्या कठीण प्रसंगात आपल्याला आधार देतात, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी ग्रंथ व वाचन याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने आयोजित रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018 चे आज येथे थाटात उद्घाटन करण्यात आले.
अलिबाग शहरातील डोंगरे सभागृहात हा सोहळा पार पडला.  यावेळी अलिबाग शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार, नागेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी  ग्रंथ सप्रेम भेट देऊन केले.
आपल्या भाषणात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, अलिकडच्या सोशल मिडीयाच्या काळात वाचन कमी झाले ही व्यथा खरी आहे. सर्वच माहिती सोशल मिडीया, इंटरनेटवर उपलब्ध असल्याने संशोधनासाठी आवर्जून वाचन होत असलेल्या संदर्भ ग्रंथांचेही वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी, नवा वाचक घडविण्यासाठी बालपणापासून वाचनाचे संस्कार रुजविणे आवश्यक आहे.ग्रंथ प्रदर्शनासारखे उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात राबवावयास हवे. तेव्हा ग्रंथोत्सव हा वर्षभर राबविण्यासारखा उपक्रम होणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यात ‘गाव तिथं वाचनालय’ हा उपक्रमही आपण राबवू असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनाचे संस्कार रुजविण्यात पालकांची भूमिका मोलाचे असल्याचे सांगून प्रत्येक ग्रंथालयातील ग्रंथपाल हा वाचनसंस्कृती रुजविण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी,  सूत्रसंचालन संतोष वझे यांनी व आभार प्रदर्शन तांत्रिक सहाय्यक अजित पवार यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक