माणूस घडविण्यासाठी वाचनसंस्कार महत्त्वाचा ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ परिसंवादात मान्यवर वक्त्यांनी मांडले विचार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- वाचनाने ज्ञान, माहिती मिळते हे जरी खरे असले तरी त्या ज्ञानाने समृद्ध असा माणूस घडविण्यासाठी वाचनाचा संस्कार महत्त्वाचा आहे, असे मत ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ या परिसंवादात सहभागी मान्यवर वक्त्यांनी मांडले.
रायगड जिल्हा ग्रंथोत्सवात उद्घाटन सत्रानंतर ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी  अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे हे होते. या परिसंवादात कांतीलाल कडू,पनवेल,संतोष पवार, माथेरान, नागेश कुलकर्णी, अलिबाग आदी मान्यवर पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी संतोष पवार म्हणाले की, वाचाल तर वाचाल हा उपदेश आपण नेहमी ऐकत असतो. तथापि, वाचन ही प्रक्रिया तुम्हाला ज्ञानी बनविणारी आहे आणि हे वाचन तुमच्यापर्यंत  पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. माध्यमांमुळे माहिती अनेकांपर्यंत पोहोचते.  मुद्रित माध्यमांच्या माहितीचा लाभ घेण्यासाठी साक्षर असणे आवश्यक आहे.  मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे माहिती ही न लिहिता वाचता येणाऱ्यांपर्यंतही पोहोचते. मात्र ज्ञान संपादन करण्यासाठी ग्रंथवाचन महत्त्वाचे आहे. ग्रंथ वाचनातही ग्रंथालयातील ग्रंथपाल हा मोलाची भूमिका बजावू शकतो. एकंदर वाचन संस्कृती रुजविण्यात माध्यमांसोबत समाजातील विविध घटकांचेही योगदान असते.
कांतीलाल कडू म्हणाले की,सध्या समाजमाध्यमांचा दबदबा निर्माण झाला आहे. सत्य लोकांना कळण्याआधी असत्य हे गावभर हिंडून आलेलं असतं. त्यामुळे वस्तूस्थिती दर्शक माहिती देणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच वर्तमानपत्रांची विश्वासार्हता टिकून आहे. बऱ्याचदा सत्य दडपून टाकण्यासाठीही माध्यमांचा उपयोग केला जातो.ज्ञानासाठी वाचली जाणारी पुस्तके ही नेहमी आपला उद्धार करतात. स्वतःला आलेले अनुभव हे सगळ्यात चांगले पुस्तक असल्याचे सांगून  ते म्हणाले की, ग्रंथ हे आपल्याला माहिती आणि जगण्याची उर्जा देतात.
अध्यक्षीय समारोप करतांना अमर वार्डे म्हणाले की, आपल्या बातमीला अधिक विश्वासार्हता येण्यासाठी पत्रकारांनी आधी वाचन केले पाहिजे. वाचक आधी आणि नंतर पत्रकार अशी भूमिका असली पाहिजे. वाचनाचा संस्कार रुजविण्यात शाळेची भूमिका महत्त्वाची असून वाचन संस्कार घडविण्याच्या या प्रयत्नात सातत्य असायला हवे असेही त्यांनी सांगितले.
या परिसंवादातील वक्त्यांचा परिचय नागेश कुलकर्णी यांनी केले, स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले, अजित पवार यांनी आभार मानले .
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक