धोकवडे येथे 7 पासून कायदा सेवा व मदत केंद्र


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदे विषयक सेवा व मदत केंद्र धोकवडे ग्रामपंचायतीच्या आवारात दि. 7 जानेवारी पासून सुरु करण्यात येणार आहे.  कायदे विषयक मदत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेस विनामूल्य व तातडीने मिळणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत देशात अशाप्रकारे कायदे विषयक सेवा व मदत केंद्र सुरु करण्यात येत आहेत. 
अलिबाग तालुक्यात धोकवडे ग्रामपंचायतीमध्ये हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. धोकवडे ग्रामपंचायत कार्यालयात सोमवाद दि. 7 रोजी साडेतीन वा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
या केंद्रामध्ये सर्वसामान्य लोकांना कायदे विषयक सर्व सहाय्य मोफत प्राप्त होईल. अनुसूचित जाती, जमातीतील व्यक्ती, स्त्री अथवा लहान मुले,अपंग व्यक्ती, तुरुंगातील कैदी, कामगार अथवा ज्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखा पेक्षा कमी अशा व्यक्ती यांना मोफत कायदे विषयक सहाय्य मिळू शकते.   सदर केंद्रामध्ये अनुभवी वकील सल्ला देण्याकरिता उपलब्ध राहतील.  तसेच दोन विधी स्वयंसेवक गावामध्ये कायम उपलब्ध राहतील.  हे विधी स्वयंसेवक गरजू व्यक्तींना कायदे विषयक मदत मिळण्याकरीता प्रयत्न करतील.  तसेच एखाद्या अशिक्षित गरजू व्यक्तींना त्यांच्या कामानिमित्ताने सरकारी कार्यालयात घेऊन जाणे, तेथे आवश्यक ते अर्ज भरणे,त्यांचे कामातील अडचण दूर करुन देणे, गरजू व्यक्तींना कायदेविषयक सहाय्य आवश्यक असल्यास तातडीने वकील उपलब्ध करुन देणे ही कामे विधी स्वयंसेवक करतील.  तरी गरजू लोकांनी त्यांच्या समस्या अथवा तक्रारी  यांचे निराकरण अनुभवी वकिलांकडून करुन घेण्याकरीता जिल्हा विधी प्राधिकरण, रायगड-अलिबाग प्रत्येक तालुक्यात कार्यरत असलेली तालुका विधी सेवा समिती अथवा अशा विधी सेवा केंद्राकडे संपर्क साधावा.  उद्घाटनाच्या दिवशी लोकन्यायालय व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर यांचेही आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे आणि या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप ज.मोहिने यांच्यामार्फत यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक