गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय कार्यशाळा ; लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ जीवनात बदल घडवतो- यावलकर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- स्वतःचे घर हे जीवनात स्थैर्य निर्माण करते.केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात गटविकास अधिकारी व यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते. या योजनांचा लाभ पोहोचवून तुम्ही लाभार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र सकारात्मक बदल घडवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभय यावलकर यांनी आज येथे केले.  
 येथील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत आवास योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक, लेखाविषयक अडचणींबाबत कार्यान्वयन यंत्रणा असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी कोकण विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री.यावलकर बोलत होते.
आवास सॉप्ट संदर्भातील तांत्रिक अडचणी, बांधकाम आणि लेखा विषयक बाबी संदर्भात पर्णकुटी,ओमकार फ्रेंड सर्कल पडवळवाडी वरसोली अलिबाग येथे ही  एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी कोकण विभाग उपआयुक्त भरत शेडगे, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड प्रकाश देवऋषी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी पनवेलकर, सहा.प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड रामदास बघे आदि उपस्थित होते.
            यावेळ मार्गदर्शन करताना श्री.यावलकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम प्रतीचा निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक,बांधकाम व लेखा विषयक बाबींच्या अडीअडचणींचे निराकरण व्हावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांना निवारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक अधिकारी वर्गाने आपल्याला दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.   
            या कार्यशाळेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रकल्प संचालक,उपअभियंता, सहा.प्रकल्प अधिकारी, लेखा अधिकारी, प्रोग्रॅमर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक