जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम मुठवली ता.माणगावः गावकऱ्यांशी पारावर गप्पा, अन घेतला पोपटीचाही आस्वाद


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 23-  मुठवली ता. माणगाव येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी काल(दि.22) गावात जाऊन मुक्काम केला. या मुक्कामात गावच्या पारावर बसून गावकऱ्यांचे सुखदुःख जाणून घेत. त्यांनी गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या ‘पोपटी’ च्या अविट चवीचा आस्वाद घेत आदरातिथ्यही स्विकारले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींतील 58 गावांचा सहभाग आहे. या अभियानासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नेमण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी त्या त्या गावात जाऊन रात्री मुक्काम करुन गावकऱ्यांशी संवाद साधावा असा एक अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी राबविला. या उपक्रमाअंतर्गत स्वतः जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशीहे काल अर्थात 22 रोजी रात्री मुठवली या गावी मुक्कामी होते. या गावात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पारावर बसून गावकऱ्यांशी संवाद साधला तर  आपल्या गावी मुक्कामाला आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने ‘पोपटी’ बनवून खाऊ घातली. जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रेमाने या आदरातिथ्याचा स्विकार केला.
या उपक्रमात प्रत्येक गावस्तरावर आढावा बैठक घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधणे हा हेतू आहे. कालच्या गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  ग्रुप.ग्रा. प. वडगांव येथील वडघर गावामध्ये भेट दिली.
यावेळी त्यांचे समवेत उप मुख्यकार्यकारी अधिकारी ओसवाल, माणगाव उपविभागीय अधिकारी  प्रशाली दीघावकर, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी म्हस्के,  गट विकास अधिकारी माणगांव रेवंडकर, तालुका कृषी अधिकारी नवले, स्वदेस फाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, राजेश पानवकार तालुकास्तरीय अधिकारी, मॅनेजर, ग्राम अधिकारी (स्वदेश फौंडेशन), तलाठी, ग्रामसेवक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, माजी सरपंच, सदस्य, अध्यक्ष गावकी, पोलिस पाटील, महिला मंडळ, ग्रामस्थ वडघर आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या हस्ते वडघर बौद्धवाडी मधील ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले. तसेच बौद्धवाडीतील रमाई आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या घरकुल कामांची पाहणी केली. त्यानंतर येथीलच हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलाची पाहणी केली. प्रगतिशील शेतकरी रवी शिंदे यांचा शेळीपालन, कुकूटपालन व मत्स्य शेतीचा प्रकल्प पहिला. वडघर समाज मंदिरासमोरील शेड बांधकामाचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी गावात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व स्वदेश फाउंडेशन अंतर्गत झालेल्या विकास कामांचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.
त्यानंतर मुठवली येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासमवेत जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ.सुभाष मस्के,  जिल्हा समन्यवक विनोद मनेकर,गट विकास अधिकारी नरेन्द्र रेवंडकर, स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार तसेच मुठवली सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेविका,तलाठी व माणगाव तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी ,स्वदेस फाउंडेशन टीम आदी उपस्थित होते.
तेथे थेट पारावर सतरंजी अंथरुन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व अदिवासी महिला गट यांचे बरोबर संवाद साधला. या अगावात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील भागीदार स्वदेस फाउंडेशन यांचा मदतीने 12 एकर मध्ये कारली लागवड केली आहे व आठवड्याला  साधारण दिड लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे आता महिलांचे वीट भट्टी वर कामाला कुटुंबा सह होणारे स्थलांतर थांबले आहे .
यावेळी मुठवली वासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘पोपटी’ चा पाहुणचार केला. त्याचा आस्वाद जिल्हाधिकाऱ्यांनी  तरुण मुले व ग्रामस्थांसोबत घेतला. मध्यरात्री बारा वाजता जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणेने आदिवासी वाडी येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन केले. स्वदेस फाउंडेशन मार्फत चार गावांमध्ये पाणी योजना लवकरच सुरू होणार आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेला प्रत्येक घरांच्या बाहेर शोषखड्डा तयार करण्याच्या सूचना दिल्या, तसेच शालेय मुलांना जातीच्या दाखल्या चे वाटप करण्यात आले. ग्राम परिवर्तक प्रमोद प्रल्हाद जाधवव  लहू दोलतडे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले. सर्व शासकीय यंत्रणा व स्वदेस फाउंडेशन च्या टीमने चांदण्या रात्री मध्ये आदिवासी वाडी मध्ये भेट दिल्यामुळे मुठवली ग्रामस्थांचा उत्साह नक्कीच  वाढला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक