प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा शेतकरी, कामगार,कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध- ना. चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26-  समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उस्ताहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक मृणलिनी देवराज आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास निवृत्त ॲडमिरल एल. रामदास सपत्निक उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत झाले.
त्यानंतर मोठ्या दिमाखदार पणे पार पडलेल्या संचालनात पालकमंत्री ना. चव्हाण यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर शानदार परेड संचलन होऊन पालकमंत्र्यांनी मानवंदना स्विकारली. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित निवृत्त ॲडमिरल एल. रामदास तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक यांची भेट घेऊन  ना. चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात पालकमंत्री चव्हाण म्हणाले की,  जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन करतांना जिल्हा नियोजन समितीने सन 2019-20 या वित्तीय वर्षासाठी 265 कोटी 5 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकासआराखडा तयार केला आहे. शासनाच्या भात खरेदी केंद्रांवर गेल्या वर्षी 58 हजार क्विंटल तर यावर्षी 63 हजार क्विंटल इतकी खरेदी झाली. यंदा ही खरेदी सुरुच असून 1 लाख 15 हजार क्विंटल पर्यंत खरेदी व्हावी ही अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून  रायगड जिल्ह्यातील 19 हजार 196 शेतकऱ्यांना 43 कोटी 63 लाख 23 हजार रुपयांची कर्जमाफीचा लाभ मिळाला तर जिल्ह्यात 5380 जणांना घरकूल योजनांचा लाभ देण्यात आम्ही यशस्वी झालोय, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रमातून 227 योजनांचा कृति आराखडा शासनाने मान्य केला असून त्यासाठी 172 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  जिल्ह्यातील  मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर मत्स्य  केंद्रांचा विकास हाती घेण्यात आला आहे असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 2022 पर्यंत दुप्पट होण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.अलिबागच्या सुप्रसिद्ध पांढऱ्या कांद्याला जागतिक ओळख निर्माण करून देण्याकरिता कृषी विद्यापीठामार्फत आत्मा योजने मधून भौगोलिक मानांकन देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अलिबागचा पांढरा कांदा हा जागतिक स्तरावर जाईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच खारभूमीच्या 95 योजनांच्या  नुतनीकरणाची कामे नाबार्ड निधी, राज्यनिधी, राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्प याव्दारे हाती घेण्यात आली आहेत.जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 5 कोटी 24 लक्ष 84 हजार रुपये निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत 5271 लाभार्थी कामगारांना  2 कोटी 63 लाख 36 हजार 400 रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात 65 कोटी 33लाख रुपये खर्च करुन समाधानकारक परिवर्तन होतांना दिसत आहे. पर्यटकांच्या उपयुक्ततेसाठी एक मोबाईल ॲप खुले करीत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलांना मदत व बचाव साहित्याचे वाटपही करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात रेल्वे सुविधांच्या बळकटीकरणाला भर देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही आकारास येत आहे. या शिवाय  जलमार्ग वाहतुकीसाठी सोई उपलब्ध करण्यात येत आहेत. येत्या काळात मुंबई महानगर विकास धोरणात रायगड जिल्ह्यापर्यंत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महामुंबई या नव्या विकास क्षेत्रात रायगड जिल्हा वेगाने पुढे जाईल, असा विश्वास ना. चव्हाण यांनी व्यक्त केला.
शानदार संचलन
प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक श्रीमती एम.डी. बाविस्कर यांनी केले. या संचलनात 16 प्लाटून आणि 9 चित्ररथांनी सहभाग घेतला. या चित्ररथांमध्ये मुद्रा बॅंक योजना व एव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीच्या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान
या समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्या सम्नानार्थिंची नावे या प्रमाणे-
शासकीय समारंभाचे निवेदन करणाऱ्या निवेदिका श्रीमती किरण करंदिकर, पोलीस दलातील मुख्यालयातील सहाय्यक फौजदार प्रदिप गोविंद पाटील, गोरेगांव पोलीस निरीक्षक अनिल गंगाधर टोपे, वनवासी विकास सेवा संघ मु.पो.उसरोली-मजगाव, ता.मुरुड-जंजिरा यांना जिल्हा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार, तसेच अमरेंद्र कुळकर्णी, नविन कुमार  गेरोला यांना उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार, प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेज पेण यांना राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत प्रथम पुरस्कार, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने  डॉ.राजेंद्र पाटील, पोलादपूर, डॉ.राहुल वारंगे, महाड, गुरुनाथ साठेलकर, खालापूर, दर्पण दरेकर, पोलादपूर, राजेश बुटाला, महाड, सागर मेस्त्री महाड, महेश सानप रोहा, सुनिल भाटीया महाबळेश्वर, संजय पार्टे सातारा, राहुल समेळ ठाणे, सचिन गायकवाड दापोली, जयपाल पाटील अलिबाग यांना शोध व बचाव साहित्य उपलब्धल, दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार दादासाहेब सोनटक्के, माणगांव, साईनाथ पवार, विष्णू धाक्रस यांना देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजरोहण व मानवंदना
प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती यांच्या सह विविध शाखांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक