मुरूड जंजिरा परिसर मेडिकल-टुरिझमसाठी विकसीत होणार, राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्यटन विभाग, महिंद्रा समूह यांच्यात करार



मुंबई, दि. २ - रायगड जिल्ह्यातील अभेद्य जलदुर्गाचा मुरूड जंजिरा परिसर मेडिकल-टुरिझम दृष्ट्या विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा उद्योग समुह यांच्या दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी आणि पर्यटकांना आकर्षित करणारा असा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता वेद सिंघल, महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, महिंद्रा लाईफस्पेसेसचे अध्यक्ष अरूण नंदा, व्यवस्थापकीय संचालक संगीता प्रसाद, वैभव जांभेकर आदींची उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वारसा स्थळ म्हणून मुरूड जजिंरा परिसराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामध्ये आता या पर्यटन प्रकल्पामुळे परिसरातील अनेकविध बाबींना चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विविध व्यावसायीक आणि रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. मेडिकल टुरिझम श्रेणीतील या प्रकल्पामुळे पर्यटकांचा मोठा वर्ग आकर्षित होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईशी संलग्नता असल्यामुळे मुंबईच्या पर्यटन क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल.
महिंद्रा उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. महिंद्रा यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उद्योगस्नेही धोरणांचे स्वागत करतानाच, हा पर्यटन प्रकल्प उद्योग समुहासाठी महत्त्वाकांक्षी आहे. यातून मेडिकल-हेल्थकेअर टुरिझमचे मोठे दालनच पर्यटकांसाठी खुले होईल. जगभरातील पर्यटक संकल्पनेला या परिसराच्या वैशिष्ट्यामुळे प्रतिसाद देतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या करारानुसार महाराष्ट्र शासन या परिसरातील जेटींचा विकास, वीज, पाणी पुरवठा अशा पायाभूत सुविधा पुरविणार आहे. 
महिंद्रा समुहाकडे या परिसरात जमीन उपलब्ध आहे. हा समूह शासनाच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने पर्यटनदृष्ट्या विविध प्रकल्पांची करेल.  त्यासाठी सुमारे पाचशे कोटींची गुंतवणूक होणे अपेक्षीत आहे. यातून जागतिक दर्जाच्या पर्यटन तसेच वैद्यकीय सुविधा विकसित केल्या जातील. 
या परिसराचा यापुर्वीच रायगड प्रादेशिक आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये हिल स्टेशन, फनसाड अभयारण्य, योग प्रशिक्षण, रोप-वे, स्थानिक हस्तकला बाजारपेठेचा विकास, निसर्ग पायवाट हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक प्रकल्प सुरु करण्यात येतील. स्थानिकांना रोजगार प्रशिक्षण देणे आणि हे सर्व पर्यटन घटक इको-टुरिझम या संकल्पनेवर विकसित करण्याची संकल्पना आहे. यातून सुमारे सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील, असेही अपेक्षीत आहे. 
या सामजंस्य करारामुळे मुरूड जंजिरा परिसरात पर्यटन तसेच अनुषांगिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार आहे. 
००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक